मुंबई : बकरी ईदनिमित्त मुंबईमधील देवनार वशुवधगृहात मोठ्या प्रमाणावर बकऱ्यांची आवक होऊ लागली असून विविध राज्यांमधील व्यापारी मोठ्या संख्येने बकरे विक्रीसाठी पशुवधगृहात घेऊन येत आहेत. पशुवधगृहात व्यापारी आणि ग्राहकांची होणारी गर्दी, तसेच मोठ्या संख्येने आणण्यात येणारे बकरे यामुळे कोणाचीही गैरसोय होऊ नये यादृष्टीने मुंबई महापालिकेकडून उपाययोजना करण्यात येत आहे. तसेच मुंबई पोलिसही विशेष काळजी घेत आहेत.

देवनार परिसरातील ६४ एकर जागेत वसलेल्या पशुवधगृहात दरवर्षी बकरी ईदनिमित्त विविध राज्यांमधून मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि व्यापारी बकरे घेऊन येत असतात. यावर्षीही राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून व्यापारी १५ दिवसांपूर्वीच बकरे घेऊन देवनार पशुवधगृहात दाखल झाले आहेत. बकरे आणि त्यांच्यासोबत येणाऱ्या व्यापाऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी पालिकेकडून घेण्यात येत आहे. बकऱ्यांना पिण्यासाठी जागोजागी पाण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच कायमस्वरूपी शेडव्यतिरिक्त अनेक ठिकाणी तात्पुरत्या शेड उभारण्यात आल्या आहेत.

याशिवाय पशुवधगृहात २४ तास वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. दरवर्षी शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी आणलेल्या बकऱ्यांची देवनार पशुवधगृहात मोठ्या प्रमाणात चोरी होते. तसेच शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी बकरे विकून जमवलेल्या पैशांवरही अनेकदा चोरटे डल्ला मारतात. आशा चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांनी यावर्षी खास खबरदारी घेतली असून येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवायसीसी टीव्हीची नजर संपूर्ण पशुवध गृहावर असून विविध ठिकाणी पोलीस मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत.

गेल्या १३ दिवसांपासून देवनार पशुवधगृहात बकरे येण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी दुपारी १२ पर्यंत या ठिकाणी ८२ हजार ३९५ बकऱ्यांची आवक झाली. तर ६ हजार ७२२ बकऱ्यांची विक्री झाली. दरवर्षी या ठिकाणी १ लाखांपेक्षा अधिक बकऱ्यांची आवक होते. बकरी ईदला काही दिवसांचा अवधी असल्याने आवक होणाऱ्या बकऱ्यांची संख्या दीड लाखाच्या वर जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली.

सीसी टीव्हीमार्फत मिळणार आगीची माहिती

महापालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही येथे विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्याचबरोबर पशुवधगृहात आगीची दुर्घटना घडल्यास तात्काळ माहिती मिळवी यासाठी एक नवीन तंत्रज्ञान मदत घेण्यात आली आहे. सीसी टीव्ही कॅमेऱ्यामध्येच हे तंत्रज्ञान असून कुठेही आग अथवा धूर सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेस आल्यास त्याबाबतचा इशारापर संदेश तत्काळ नियंत्रण कक्षाला मिळणार असून यामुळे आग नियंत्रणात आणण्यास मदत होईल, अशी माहिती देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलिमपाशा पठाण यांनी दिली.