मुंबईतील धारावी पोलिसांनी बालविक्रीचे रॅकेट उघड केले आहे. त्यांनी दीड वर्षांच्या चिमुकल्याची तमिळनाडूमधून सुटका केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मुलाच्या वडिलांनी त्याला १ लाख रुपयांना विकले होते. त्यानंतर मुलाला तमिळनाडूत नेण्यात आले आणि तेथे एका दाम्पत्याने त्याला ४.८ लाख रुपयांना विकत घेतल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. याबद्दल सविस्तर वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
रुग्णालयात शोध घेतल्यानंतर प्रकरण उघड
हे प्रकरण ८ ऑगस्ट रोजी समोर आले. मुलाचा काका सनी सिंह याने धारावी पोलिसांकडे धाव घेतली. कुटुंबीयांनी मुलाला डोक्याला दुखापत झाल्याने सायन रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले होते. मात्र, रुग्णालयात जाऊनही सनीला मुलाचा ठावठिकाणा लागला नाही.
पोलिसांच्या माहितीनुसार, ६ ऑगस्ट रोजी सनीच्या आईला त्याच्या बहिणीचा फोन आला होता. मुलगा पडल्यामुळे त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे तिला सांगण्यात आले होते. सनी रुग्णालयात पोहोचला, मात्र तिथे मुलगा नव्हता. त्यानंतर त्याने कुटुंबीयांच्या घरी जाऊन चौकशी केली. त्यावेळी आईने मुलाला विकल्याचे सांगितल्याचा पोलिसांचा दावा आहे.
बेरोजगारीमुळे मुलाला विकल्याचा आरोप
तपासादरम्यान पोलिसांनी मुलाचे वडील संदीप सिंह याला अटक केली. चौकशीत त्याने बेरोजगार असल्याने पैशांची गरज होती आणि त्यामुळे एका महिलेला १ लाख रुपयांना मुलाला विकल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्यानंतर तपास शबनम खान ऊर्फ राणीपर्यंत पोहोचला. पोलिसांच्या मते, ती मुलाची विक्री करणारे आणि खरेदीदार यांच्यातील मध्यस्थ म्हणून काम करत होती. खानने यापूर्वी आयव्हीएफ केंद्रांमध्ये काम केले होते. त्या काळातील संपर्कांचा वापर करून मुलाला दत्तक घेण्यास किंवा विकत घेण्यास इच्छुक लोकांचा शोध घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
४.८ लाख रुपयांना तमिळनाडूत विकल्याचा आरोप
पोलिसांच्या माहितीनुसार, खानने मुलाला ४.८ लाख रुपयांना विकले आणि त्याला तमिळनाडूत नेण्यासाठी इतर आरोपींची मदत घेतली. त्यानंतर तमिळनाडूतील एका दाम्पत्याने मुलाला विकत घेतल्याचे तपासात समोर आले.
धारावी पोलिसांनी विविध पथके तयार करून तपास सुरू केला. शबनम खानला अटक केल्यानंतर तिच्या चौकशीतून या प्रकरणात आणखी लोक सहभागी असल्याची माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर प्रिया बोराडे, आकाश बोराडे, दीपक मोरे यांच्यासह अन्य आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.
चिमुकला बालकल्याण समितीकडे
पोलिसांनी तमिळनाडूतून मुलाची सुटका केली असून त्याला आता बाल कल्याण समितीकडे सोपवण्यात आले आहे. बालविक्रीच्या या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच अशाच प्रकारे इतर मुलांची विक्री झाली आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
