मुंबई :बारावीच्या निकालामध्ये १०० टक्के निकाल लागलेल्या महाविद्यालये आपली पाठ थोपटून घेत असताना मुंबई विभागातील तीन कनिष्ठ महाविद्यालयांचा पूर्णपणे शून्य टक्के निकाल लागला आहे. सात महाविद्यालयांमधील काही विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवसाय शिक्षण यांपैकी काही शाखांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. त्यात ठाणे जिल्ह्यात अशा सर्वाधिक कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश आहे. तर रायगड जिल्ह्यातील एकाही कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शून्य टक्के लागलेला नाही.
विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच महाविद्यालयांच्या निकालालाही फार महत्त्व असते. महाविद्यालयाचा निकाल चांगला लागला तर विद्यार्थ्यांचा प्रवेश घेण्याचा कल वाढतो. मात्र मुंबई विभागातील १० महाविद्यालयांना शून्य निकालाचा सामना करावा लागला आहे. त्यात सात महाविद्यालयांमधील एका विशिष्ट शाखेचा निकाल शून्य टक्के लागला आहे, तर तीन महाविद्यालयांचा संपूर्ण निकालच शून्य टक्के लागला आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कनिष्ठ महाविद्यालयांना शून्य निकालाचा सामना करावा लागला. ठाण्यातील एका महाविद्यालयाचा निकाल शून्य टक्के लागला तर चार महाविद्यालयांमधील शाखांना खाते उघडता आले नाही. पालघरमध्येही एका महाविद्यालयाचा निकाल शून्य टक्के लागला तर चार महाविद्यालयातील शाखांचा निकाल शून्य टक्के लागला. मुंबई शहरातील एका महाविद्यालयाचा निकाल शून्य टक्के लागला. मात्र मुंबई उपनगर आणि रायगड जिल्ह्यामधील कोणत्याही शाळेवर ही नामुष्की ओढवली नाही.
कारण काय? बहुतेकवेळा शून्य टक्के निकाल लागलेली महाविद्यालये ही नवी किंवा कमी विद्यार्थीसंख्येची असल्याची दिसते. अगदी दोन, चारच विद्यार्थी असतील आणि तेही अनुत्तीर्ण झाले तर महाविद्यालयाचा निकाल शून्य टक्के होतो. त्याचवेळी एखादा विद्यार्थी आहे आणि तो उत्तीर्ण झाल्यामुळे शंभर टक्के निकाल लागल्याचे दिसणारीही महाविद्यालये आहेत.
ठाण्यातील कोणती महाविद्यालये? ठाणे जिल्ह्यातील अंबाडी येथील गुरूकूल विज्ञान आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेूतन एकच विद्यार्थी परीक्षेला बसला होता. तोही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यामुळे या महाविद्यालयाचा निकाल शून्य टक्के लागला आहे. तसेच पिंपळास येथील सरस्वती माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतील विद्यार्थी उत्तीर्ण झाले असले तरी विज्ञान शाखेचा निकाल शून्य टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून एक विद्यार्थी परीक्षेला बसला होता. त्याचप्रमाणे न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतून ३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तिघेही अनुत्तीर्ण झाले. मात्र या महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील १० विद्यार्थ्यांपैकी आठ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कल्याणमधील आर. के. रात्र कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतूून परीक्षेल बसलेले दोन्ही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. तर कला शाखेतून बसलेले दोन्ही विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामुळे एका शाखेचा निकाल १०० टक्के तर एका शाखेचा निकाल शून्य टक्के लागला आहे. जे. के. पाटील इग्लिश मिडियम स्कूल आणि महाविद्यालयातील विज्ञान व वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला तर कला शाखेचा निकाल शून्य टक्के लागला. कला शाखेतून फक्त एकाच विद्यार्थ्याने परीक्षा दिली होती.
पालघरमध्ये चार महाविद्यालयांमध्ये शून्य पालघरमधील जव्हार तालुक्यातील भगवान बिरसा मुंडा इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधील टेक्निकल सायन्समधून एक विद्यार्थी परीक्षेला बसला होता. तोही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याने या महाविद्यालयाचा निकाल शून्य टक्के लागला. तसेच शारदा कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेचा निकाल शून्य टक्के लागला आहे. या महाविद्यालयातून एक विद्यार्थी परीक्षेला बसला होता. तर वाणिज्य व विज्ञान शाखेचा निकाल हा अनुक्रमे ६७.९० तर ८५.५० इतका लागला. त्याचप्रमाणे लॉर्ड्स इंग्लिश स्कूल शाळेच्या कला शाखेचा निकाल शून्य टक्के लागला ४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तर, विज्ञान शाखेचा ५०.३९ आणि वाणिज्य २७.५२ टक्के लागला. श्री गजनंद सिंग हायस्कूल ॲण्ड ज्युनियर कॉलेज कला शाखेचा निकाल शून्य टक्के लागला, तेथील ४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. विज्ञान शाखेचा ८९.५९ आणि वाणिज्य ७९.६८ टक्के लागला.
मुंबईलाही शून्य निकालाचे बालंट प्रियदर्शनी विद्या मंदिर ॲण्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड कॉमर्स या महाविद्यालयाच्या फक्त कला शाखेतून एक विद्यार्थी परीक्षेला बसला होता. ताे विद्यार्थी अनुतीर्ण झाल्यामुळे महाविद्यालयाचा निकाल शून्य टक्के लागल्याने मुंबईलाही शून्य निकालाचे बालंट लागले आहे. मात्र उपनगरामधील एकाही महाविद्यालयाचा निकाल शून्य टक्के नाही.
