मुंबई : भवतालातील प्रश्नांची, आपल्या भावविश्वाची तरुण रंगकर्मींनी केलेली मांडणी, प्रेक्षकांची दाद, स्पर्धकांचा जल्लोष अशा वातावरणात रंगलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत मुंबई विभातील म. ल. डहाणूकर महाविद्यालयाची ‘जब वी मेटा’ महाराष्ट्राची लोकांकिका ठरली. द्वितीय क्रमांक पुणे विभागातील मॉडर्न महाविद्यालयाच्या ‘वामन आख्यान’ या एकांकिकेने तर तृतीय क्रमांक ठाणे विभागातील सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाची ‘थिम्मक्का’ या एकांकिकेने पटकावला.

राज्यभरातील युवा रंगकर्मींचे विविध विषयांवरील रंगतदार सादरीकरण, तुडुंब भरलेल्या सभागृहातून कधी टाळ्यांतून, कधी एखाद्या संवादाला दिलेली उत्स्फूर्त दाद आणि ख्यातनाम नाट्यकर्मींची उपस्थिती अशा उत्साहपूर्ण वातावरणात ‘लोकसत्ता लोकांकिका’ ची महाअंतिम फेरी शनिवारी, प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे रंगली. महाअंतिम फेरीची सुरुवात नेहरू पोर्ट प्राधिकरणाचे कॅप्टन शशिकांत जाधव, सॉफ्ट कॉर्नरचे दिलीप कुलकर्णी, आयरिस प्रॉडक्शन्सचे विद्याधर पठारे आणि ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वल करून केली. दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, प्रसिद्ध अभिनेते सुमित राघवन, मकरंद अनासपुरे यांनी महाअंतिम फेरीच्या परीक्षणाची धुरा सांभाळली.

‘लोकसत्ता लोकांकिके’च्या निमित्ताने यंदाही राज्यभरातील युवा रंगकर्मींची अनेकविध विषयांवरील अभिव्यक्ती आणि त्यावरील नावीन्यपूर्ण सादरीकरण नाट्यप्रेमींना अनुभवता आली. युवा रंगकर्मींचा रंगमंचीय आविष्कार आणि स्पर्धेची चुरस अनुभविण्यासाठी मुंबई, ठाण्यासह पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर यांसह विविध भागांतील नाट्यरसिक उपस्थित होते. स्पर्धकांनी आपल्या भवतालातले, आपल्या मातीतले प्रश्न, जाणिवा आणि तिथले जगणे यांचे दर्शन एकांकिकांच्या माध्यमातून घडविले. कधी शेतकऱ्यांच्या जगण्याचे पैलू, कधी पर्यावरणासाठी भरीव योगदान देणाऱ्या थिम्मक्का यांचे जीवन तर कधी कोकणातील दशावतार कलाकाराच्या आयुष्यातील संघर्ष आणि विविध विषयांवरील सादरीकरणांनी प्रेक्षकांची दाद मिळविली.

कधी विषय, सादरीकरण यांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला तर कधी प्रकाशयोजनेने डोळे दिपवले. कुणाचे संगीत, कुणाचा अभिनय प्रेक्षकांना भावला आणि स्पर्धेची चुरस वाढत गेली. स्पर्धक विद्यार्थी संघही एकमेकांच्या सादरीकरणाला, प्रयोगांना मनापासून दाद देत होते. खेळीमेळीचे वातावरण, जिंकण्याची जिद्द पण त्याच वेळी दुसऱ्या संघाकडून शिकण्याची तयारी स्पर्धक संघांच्या सादरीकरणाइतकीच कौतुकाची थाप मिळवून गेली.

स्पर्धेसाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक शहा यांनी यावेळी युवा रंगकर्मीना रंगभूमीचे धडे दिले. त्यांच्याशी लोकांकिकांच्या रंगमंचावरून कलाक्षेत्रात पदार्पण केलेले रावबा गजमल, अजय पाटील, अपूर्वा भिलारे यांनी संवाद साधला. शहा आणि मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. महाअंतिम फेरीचे सूत्रसंचालन कुणाल रेगे यांनी केले.

यंदापासून निर्मात्यांचे ‘विशेष पारितोषिक’

एखाद्या एकांकिकेत, संहितेत पूर्ण नाटकात रूपांतरित होण्याची ताकद असते. अशा एकांकिकेला यंदापासून निर्मात्यांकडून विशेष पारितोषिक देण्यात आले. ‘जब वी मेटा’ या एकांकिकेने हे पारितोषिक पटकावले. ‘आयरीस प्रॉडक्शनस’चे विद्याधर पाठारे यांनी हे पारितोषिक जाहीर केले.

महाअंतिम फेरी निकाल

सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम – जब वी मेटा

(म. ल. डहाणूकर महाविद्यालय, विलेपार्ले )

सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय – वामन आख्यान (मॉडर्न महाविद्यालय, पुणे )

सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय – थिमक्का

(सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे )

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, विनय आपटे स्मृती पारितोषिक – पराग दिनानाथ ओझा (जब वी मेटा)

सर्वोत्कृष्ट लेखक – साईराज घोलप (थिमक्का)

सर्वोत्कृष्ट अभिनय – प्रांज्वल प्रभाकर पडळकर (वामन आख्यान)

सर्वोत्कृष्ट अभिनय – शंतनू दिलीप ढवळी (जब वी मेटा)

सर्वोत्कृष्ट अभिनय – केतकी मालवणकर (वामन आख्यान)

अतुल परचुरे स्मृती पुरस्कार – सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय – विराज दिघे (वामन आख्यान)

सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार – सिद्धेश नांदलस्कर (थिमक्का)

सर्वोत्कृष्ट संगीत – अमेय चव्हाण, चिन्मय पंडित, सार्थ गवस (जब वी मेटा)

सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना – साई शिरसेकर / प्रथमेश जाधव (राशोमोन) लोकनेते व्यंकटराव हिरे कनिष्ठ महाविद्यालय, नाशिक

परीक्षक पसंती वेशभूषा – (थिम्मक्का)

परीक्षक पसंती अभिनय – प्रसाद फडके (तुकारामाची टोपी)

परीक्षक पसंती अभिनय – ऋतू मोरे (जब वी मेटा)

परीक्षक पसंती अभिनय – अपर्णा घोगरे (थिम्मक्का)