मुंबई : मुंबईत सलग नऊ महिने मालमत्ता नोंदणी १२ हजारांहून अधिक होत आहे. दिवाळीच्या आधीच्या महिन्यात पितृपक्षामुळे मालमत्ता नोंदणी थंडावते. मात्र यंदा १२ हजार ६९० मालमत्तांची नोंदणी झाली. त्यामुळे दिवाळीत ती आणखी वाढेल, असा विश्वास विकासकांना वाटत आहे.
नाइट फ्रँक इंडियाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०२६ मध्ये १२ हजार ६९० मालमत्तांची नोंदणी झाली. मागील वर्षाच्या तुलनेत त्यात नऊ टक्के वाढ नोंदवली गेली आहे तर मुद्रांक शुल्क संकलनातही १३ टक्के वाढून १,१७३ कोटी रुपयांवर पोहोचले. शहराने सलग नवव्या महिन्यात मासिक नोंदणीचा १२ हजारांचा टप्पा कायम ठेवला आहे. हा आत्तापर्यंतचा विक्रम मानला जात आहे.

मुंबईच्या रिअल इस्टेट बाजारात उत्साहवर्धक स्थिती असली तरी व्यापक आर्थिक वातावरणाबाबतही सजग राहिले पाहिजे. शेअर बाजारातील अलीकडील मंदी आणि अस्थिरता, जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि बदलणारा ग्राहक दृष्टिकोन यामुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. रिअल इस्टेट हे भांडवल-प्रधान आणि विश्वासावर चालणारे क्षेत्र असल्याने व्यापक आर्थिक ट्रेंडपासून अलिप्त राहू शकत नाही, अशी प्रतिक्रिया नरेडको महाराष्ट्रचे अध्यक्ष कमलेश ठाकूर यांनी दिली. धोरणकर्ते आणि सरकारसाठी सक्रिय राहण्याची हीच नेमकी वेळ आहे. सध्याच्या वाढीचा उत्सव साजरा करणे हा उद्देश असू नये, तर ही वाढ शाश्वत असल्याची खात्री करणे हा असला पाहिजे. वेळेवर धोरणात्मक सहाय्य आणि अनुकूल व्यावसायिक वातावरणासह, रिअल इस्टेट क्षेत्र रोजगार, गुंतवणूक आणि देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणे सुरू ठेवू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पितृ पक्षाच्या कालावधीतही, गेल्या वर्षीच्या दररोज ३०६ मालमत्ता नोंदणींच्या तुलनेत, दैनिक नोंदणी वाढून ३११ वर पोहोचली. खरेदीदार पारंपारिक मौसमी मंदीपेक्षा योग्य मूल्याच्या मालमत्तांना आणि अनुकूल गृहकर्ज स्थितीला प्राधान्य देत आहेत. याचा फायदा विकासकांनी करुन घेतला पाहिजे. दिवाळीच्या सणात ऑफर्स आणि नवीन प्रकल्पांची घोषणा करुन ग्राहकांना आकर्षित करणे आवश्यक असल्याचे मत द गार्डियन्स रिअल इस्टेट अडव्हायजरीचे सह-संस्थापक श्राम नाईक यांनी व्यक्त केले. मालमत्ता नोंदीतील वाढ म्हणजे परिपक्व होत असलेल्या खरेदीदारांची मानसिकता अधोरेखित करते. याशिवाय, लोकसंख्या शास्त्रानुसार, बाजाराच्या अधीन राहून भविष्यात महत्त्वपूर्ण रिअल इस्टेट स्टॉक सामावून घेण्यासाठी आपण उत्तम प्रकारे सज्ज आहोत.

दक्षिण आणि दक्षिण-मध्य मुंबईच्या प्रीमियम मायक्रो-मार्केटमध्ये, आम्हाला कोणतीही सुस्ती अजिबात दिसून येत नाही, असे निरीक्षण सुपर्ब रिअल्टीचे व्यवस्थापकीय संचालक शिल्पीन तातेर यांनी नोंदवले. मुंबईच्या निवासी मालमत्ता नोंदणीत ऑक्टोबरमध्ये नऊ टक्के वार्षिक वाढ नोंदवणे, हे खूपच सकारात्मक आहे. आता विकासकांनी वेळेत घरांचा ताबा देण्याची भूमिका पार पाडली पाहिजे. त्यामुळे खरेदीदारांमध्ये विश्वास निर्माण होऊन दिवाळीत मालमत्ता नोंदणी विक्रमी होईल, असा विश्वास ट्रान्सकॅार्न डोव्हलपर्सच्या श्रद्धा केडिया-अग्रवाल यांनी व्यक्त केला.