मुंबई : दिवाळीची चाहूल लागताच मुंबईतील रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणे रोषणाईने उजळू लागतात. दिवाळीच्या निमित्ताने राजकीय पक्षांकडूनही विविध ठिकाणी कंदील लावून सजावट केली जाते. यंदाही विविध प्रभागात राजकीय पक्षांचे कंदील लावण्यात आले आहेत. दरम्यान, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मनसेने नेहमीचा दीपोत्सव रद्द केला असला तरीही विद्युत रोषणाईऐवजी कंदिलांच्या सजावटीवर अधिक भर दिला आहे. संपूर्ण शिवाजी पार्कचा परिसर कंदिलाच्या झगमगाटात उजळला आहे.
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीनिमित्त विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही आपापल्या प्रभागातील रस्ते, गल्ली, नाके आणि चौकाचौकात कंदील लावण्याची लगबग सुरू केली आहे. शिवसेनेच्या (ठाकरे) २२७ शाखांमार्फत, तसेच मध्यवर्ती कार्यालयांमार्फत प्रत्येक प्रभागात कंदील लावण्यात आले आहेत. तसेच, भाजपनेही रोषणाईचा सण साजरा करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. सुमारे ३०० ते ३५० कंदील लावण्याचे नियोजन स्थानिक पातळीवर करण्यात आल्याचे महापालिकेतील सभागृहनेते व भाजपचे गटनेते गणेश खणकर यांनी सांगितले. दिवाळीच्या काळात शिवाजी पार्क परिसरात होणारा मनसेचा दीपोत्सव हे मुंबईतील प्रमुख आकर्षण असते. शिवाजी पार्क आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दीपोत्सव हे जणू समीकरणच बनले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानालगत असलेल्या शिवाजी पार्क परिसरात दरवर्षी मनसेकडून मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा केला जातो. दीपोत्सवाच्या रोषणाईत दिवाळी साजरी करण्यासाठी हजारो तरुण – तरुणी शिवाजी पार्क येथे दाखल होतात. मात्र, यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पार्कातील सजावटीचे स्वरूप बदलल्याचे निदर्शनास येत आहे. विद्युत रोषणाईऐवजी यंदा कंदिलांच्या सजावटीवर अधिक भर देण्यात आला आहे. साध्या तरीही पारंपरिक पद्धतीने सण साजरा करण्यावर मनसेने भर दिला आहे. गतवर्षी शिवाजी पार्कात साधारण २५ – ३० कंदील लावण्यात आले होते. मात्र, यंदा ४५ हून अधिक कंदील लावण्यात आल्याचे समजते. शिवाजी पार्क व आसपासच्या रस्त्यांवर लावण्यात आलेल्या मनसेच्या कंदीलांमुळे परिसराला देखणे रूप प्राप्त झाले आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नेहमीप्रमाणे मोठ्या प्रमाणावर विद्युत रोषणाई न करता कंदिलांच्या माध्यमातून दिवाळीचा उत्साह कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
दरम्यान, शिवाजी पार्क परिसरात अन्य राजकीय पक्षांचे कंदील तुलनेने कमी दिसत असले तरी नगरसेवकांनी आपापल्या स्तरावर कंदील लावण्यावर भर दिला आहे. शिवाय शिवसेनेच्या (ठाकरे) काही शाखाप्रमुखांनीही कंदील लावण्यासाठी पुढाकार घेतल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. भाजपच्या नगरसेवकांनीही प्रभागनिहाय सजावटीवर भर दिल्याचे चित्र आहे.
मनसेकडून दरवर्षी कंदील बनविण्यासाठी ऑर्डर असते. सर्व कंदील साडे पाच फुटाचे असून ते बनविणे अत्यंत अवघड, कौशल्याचे आणि संयमाचे काम आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १३० कंदीलांची ऑर्डर आली. कंदील बनविण्यापासून चौकाचौकात तसेच शिवाजी पार्क परिसरात लावण्यापर्यंत सर्व कामांची जबाबदारी आमची असते. वरळी ते माहीम परिसरात कंदील लावण्यात आले आहेत. सर्व पक्षांच्या तुलनेत मनसेने कंदिलांची परंपरा कायम ठेवली आहे.- जितू सोनकर, कंदील व्यावसायिक
गेल्या ६०-६५ वर्षांपासून कंदीलांच्या व्यवसायात आहोत. मात्र, यंदा फारच वेगळे चित्र आहे. सत्ताधाऱ्यांकडून यंदा एकाही कंदीलासाठी ऑर्डर आलेली नाही. पूर्वी भाजपचे मोठ्या प्रमाणात कंदील बनविले जात होते. अनेक कंदील नागपूरात देखील पाठविण्यात आले होते. मात्र, यंदा भाजपसोबतच शिवसेना (ठाकरे), (शिंदे) यांनीही आखडता हात घेतला आहे. किमान कारागिरांच्या व्यवसाय सुरू रहावा, दिवाळीची परंपरा अबाधित राहावी, यासाठी राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यायला हवा होता.- प्रकाश जठाळ, कंदील व्यावसायिक
कंदील लावण्याची चुरसच नाही
पूर्वी दिवाळीनिमित्त विविध राजकीय पक्षांमध्ये कंदील लावण्याची जणू चुरस होत आहे. मात्र, आता कालौघात राजकीय पक्षांकडून कंदील लावण्याची स्पर्धा तुलनेने कमी झाल्याचे चित्र आहे. मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्याच मुळात कमी असल्याने कंदिलांच्या सजावटीत त्यांचा सहभागही मर्यादित आहे. शिवसेनेने (शिंदे) देखील प्रभागवार सजावटीवर भर दिल्याचे समजते.
