मुंबई : ‘सीसीएमपी’ पात्रता प्राप्त होमिओपॅथी डॉक्टरांच्या एमएमसी नोंदणीची प्रक्रिया तत्काळ स्थगित करावी, उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत कोणतीही पुढील कार्यवाही करू नये, निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित प्रश्नांवर शासनाने तातडीने चर्चा करावी, या मागण्यांसाठी मार्डने बुधवारपासून बंद पुकारला आहे. या बंदचा रुग्णसेवेवर फारसा परिणाम झाला नसला तरी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले.

जे. जे. रुग्णालयामध्ये दररोज साधारणपणे १ हजार ७३५ रुग्ण हे बाह्यरुग्ण विभागामध्ये उपचारासाठी येतात. मात्र, बुधवारच्या बंदमुळे जे.जे. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागामध्ये उपचारासाठी असलेल्या रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाली. बाह्यरुग्ण विभागामध्ये दुपारी १२ वाजेपर्यंत १ हजार ३३३ इतक्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, दररोज साधारणपणे १०२ रुग्णांना रुग्णालयात दाखल केले जाते. मात्र, बुधवारी फक्त ३९ रुग्णांनाच दाखल करण्यात आले. बंदचा परिणाम शस्त्रक्रियांवर झाला असल्याचेही दिसून आले. दररोज साधारणपणे ३९ शस्त्रक्रिया केल्या जातात, मात्र बुधवारी फक्त ४ शस्त्रक्रिया झाल्याची माहिती जे. जे. रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.

नायर, शीव, कूपर रुग्णालयातील सेवेवर परिणाम

  • नायर रुग्णालयामध्येही रुग्ण संख्येत घट झाली असून दररोज साधारणपणे दोन हजार रुग्ण

उपचारासाठी येतात. मात्र, बुधवारी फक्त १ हजार १३२ रुग्णांची नोंद झाली. त्याचप्रमाणे दररोज ४० शस्त्रक्रिया होत असताना बुधवारी फक्त २९ शस्त्रक्रिया झाल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी दिली.

  • शीव रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागामध्ये बुधवारी १ हजार १२७ रुग्ण उपचारासाठी आले. राेज ही संख्या २ हजार ७०० च्या सुमारास असल्याने तब्बल १५०० पेक्षा जास्त घट झाली. तर २०० च्या आसपास शस्त्रक्रिया होत असताना, बुधवारी फक्त १२० शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांनी दिली.
  • कूपर रुग्णालयातही एक हजारपेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, बुधवारी फक्त ६७६ रुग्णांची नोंद बाह्यरुग्ण विभागामध्ये झाली. तसेच, आठ मोठ्या आणि पाच लहान शस्त्रक्रिया झाल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. छाया शिंदे यांनी दिली.