केंद्रीय मंत्री आणि रिपब्लीन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या ताफ्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली आहे. हा पोलीस कर्मचारी आठवले यांच्या वांद्रे येखील निवासस्थानावर तैनात होता. या पोलिस कर्मचाऱ्याला ताबडतोक रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे. सध्या या कर्मचाऱ्याला पनवेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आलंय. करोना विषाणूची लक्षणं दिसून आल्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्याची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली होती. रामदास आठवलेही सध्या आपल्या मुंबईतल्या घरात क्वारंटाइन आहेत.

अवश्य वाचा – तबलिगींविरोधात अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीवर मुंबईत गुन्हा दाखल

दरम्यान महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ताफ्यातील एक पोलिस कर्मचारी करोना बाधित झाल्यामुळे त्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. सध्या आव्हाडांवरही ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान भारतासह जगभरात करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर अद्याप नियंत्रण मिळवण्यात आलेलं नाही. भारतातही महत्वाच्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्ण सापडत आहेत. लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवण्यात आलेलं असलं तरीही काही भागात लोकं नियम मोडून रस्त्यावर येत असताना दिसत आहेत. दरम्यान या विषाणूवर अद्याप ठोस औषध मिळालेलं नाही, त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण कधी मिळवलं जाईल हे सांगणं कठीण होऊन बसलं आहे.