पोलिसांकडून वाहने उचलू नयेत यासाठी नवी शक्कल
‘नो पार्किंग’मध्ये लावलेल्या वाहनावर कारवाई होऊ नये म्हणून बंदी असलेल्या वाहन चाक कुलपचाच (क्लॅम) आधार काही वाहनचालक घेऊ लागले आहेत. आपल्या वाहनाच्या पायात आपल्याच क्लॅमच्या बेडय़ा टाकल्या की वाहतूक पोलिसांना गाडीच उचलता येत नाही. म्हणून हा प्रकार अवैध असला तरी वाहनचालकांमध्ये चांगलाच लोकप्रिय होऊ लागला आहे. अवैध पार्किंगवर कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांची डोकेदुखी मात्र यामुळे वाढली आहे.
सध्या शहरात सुमारे २५ लाख वाहने रस्त्यावर धावत आहेत. यात खासगी वाहनांची संख्या सर्वाधिक आहे. त्यात दर वर्षी सुमारे १ लाख वाहनांची भर पडते आहे. त्यात वाहतुकीबरोबरच पार्किंगचा प्रश्नही भीषण बनतो आहे. काही ठिकाणी पार्किंगच्या वादाला हिंसक वळण लागल्याचे दिसून येते. ५० टक्क्यांहून अधिक वाहनचालक रस्त्याच्या शेजारी वाहन उभे करत असल्याचे पाहायला मिळते. मात्र गाडी लावताना वाहनाची उचलेगिरी करणाऱ्या कंत्राटदारांच्या जाळ्यात अडकू नये, यासाठी काही चालक चाक कुलूप विकत घेऊन स्वत:च गाडीला लावत आहेत. मुंबई तसेच ठाणे, अशा पार्किंगचा प्रश्न असलेल्या भागात हा प्रकार सर्रास पाहायला मिळतो.
वाहन चाक कुलपांच्या खरेदी किंवा विक्रीवर बंदी आहे. पण, मुंबई तसेच उपनगरात अनेक ठिकाणी ९०० ते १२०० रुपयांपर्यंत वाहन चाक कुलूप सहज उपलब्ध होते. चर्नीरोड, कुर्ला भागातील काही दुकानांत खेळणी अडवल्याप्रमाणे ही कुलपे अडकवलेली असतात. ऑनलाइन बाजारातही १९०० ते २५०० रुपयांपर्यंत हे चाक कुलूप उपलब्ध आहे. त्यामुळे वाहनचालकांबरोबरच अशा कुलपांची विक्री करणाऱ्यांवरही कारवाई केली जावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या विषयी वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला विचारले असता, अशा प्रकरणात वाहनचालकांकडून १२०० रुपयांचा दंड वसूल केला जातो, असे सांगण्यात आले. महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ च्या २२२ नुसार, नो पार्किंग क्षेत्रात वा सार्वजनिक ठिकाणी एखादे वाहन उभे केले असल्यास आणि वाहतूक कोंडी होत असल्यास असे वाहन जप्त करण्याचा अधिकार केवळ पोलीस सहायक निरीक्षकाचा दर्जा असलेल्या अधिकाऱ्यालाच देण्यात आला आहे. या अधिकाऱ्याला नो पार्किंग क्षेत्रात उभ्या असणाऱ्या वाहनाच्या चाकाला कुलूप करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे नागरिकांना अशा प्रकारे नो-पार्किंग क्षेत्रात वाहनाला लॉक करण्यास बंदी आहे.

पार्किंगचे २०० रु., दंड अवघा १०० रु.
पार्किंगचे शुल्क २०० रुपयांच्या आसपास आकारले जाते. पण, नो-पार्किंगसाठीचा दंड केवळ १०० रुपये आहे. त्यामुळेही कायदा पायदळी तुडवला जात आहे. जोपर्यंत दंडाची रक्कम वाढत नाही, तोपर्यंत अशा प्रकरांना आळा बसणार नाही, असे वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

वाहतूक पोलिसांचे ‘बळ’ कमी
सध्या मुंबई व उपनगरात ३४ वाहतूक चौक्या आहेत. या प्रत्येक चौकीत दोनप्रमाणे ६८ टोइंग क्रेन गाडय़ा आहेत. मात्र बेशिस्त चालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडील मनुष्य बळ अतिशय कमी आहे.