मुंबई: नशेच्या आहारी गेलेल्या पित्याने स्वतःच्या पाच वर्षांच्या मुलीच्या चेहऱ्यावर चटके देऊन बेदम मारहाण केल्याची घटना मानखुर्द परिसरात घडली. याप्रकरणी एका सामाजिक कार्यकर्त्यांने केलेल्या तक्रारीवरून मानखुर्द पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी पित्याला अटक केली.
मानखुर्दमधील करबाला मैदानजवळ राजेश्याम रघुराम (३८) पत्नी आणि दोन मुलांसह राहतो. काहीच कामधंदा नसल्याने तो गेल्या अनेक वर्षापासून नशेच्या आहारी गेला होता. त्यामुळे तो मुलांना आणि पत्नीला बेदम मारहाण करीत होता. पत्नी मंगळवारी घरकाम करण्यासाठी गेली होती. त्यावेळी त्याने स्वतःच्या पाच वर्षांच्या मुलीला बेदम मारहाण केली. त्यावेळी मुलगी जोरजोरात ओरडत होती.
शेजारी राहणाऱ्या एका मुलीने या प्रकार मोबाइल कॅमेऱ्यात टिपला. मारहाणीची चित्रफित तिने परिसरातील एका सामाजिक कार्यकर्त्याला पाठवली. आरोपी मुलीचा गळा आवळत असल्याचे चित्रण पाहताच सामाजिक कार्यकर्त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर मानखुर्द पोलिसांनी आरोपीच्या घरी जाऊन त्याच्या तावडीतून मुलीची सुटका केली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.