मोठी घडामोड! शाहरुख खानने आर्थर रोड तुरुंगात जाऊन घेतली आर्यनची भेट

क्रुझवरील अमलीपदार्थांच्या पार्टीप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे

Mumbai Drugs Case, Bollywood Actor Shahrukh Khan, Arthuhr Road Jail, Aryan Khan,
क्रुझवरील अमलीपदार्थांच्या पार्टीप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे

क्रुझवरील अमलीपदार्थांच्या पार्टीप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. बुधवारी अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला. दरम्यान आर्यन खानच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यादरम्यान आर्यन खानला भेटण्यासाठी शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगात पोहोचला होता.

साधी कार, अचानक भेट आणि १० मिनिटांची चर्चा; शाहरुख-आर्यन भेटीदरम्यान नेमकं काय घडलं?

करोना काळात जेलमधील कैद्यांना नातेवाईकांना भेटण्याची परवानगी नव्हती. पण परिस्थिती सुधारत असल्याने निर्बंध शिथील करण्यात आले असून नातेवाईकांना परवानगी देण्यात आली आहे. यानंतर शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगात पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत सुरक्षारक्षक उपस्थित होते. मात्र त्यांना जेलच्या बाहेरच थांबवण्यात आलं. २ ऑक्टोबरला आर्यन खानला अटक करण्यात आली असून त्यानंतर पहिल्यांदाच शाहरुख खान आपला मुलगा आर्यन खानला भेटला.

शाहरुख खान येणार असल्याची कोणालाही माहिती नव्हती. अचानक सकाळी ९ वाजता शाहरुख खान साध्या कारने आर्थर रोड तुरुंगाबाहेर पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत पत्नी गौरी किंवा मुलगी नव्हती. फक्त खासगी सुरक्षारक्षक त्याच्यासोबत होते. यानंतर नातेवाईकांना आत जाण्याची परवानगी आहे त्या गेटमधून शाहरुख खान आर्यनला भेटण्यासाठी गेला. शाहरुख खानने आर्यनला भेटण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन पोहोचला होता. जवळपास १५ ते २० मिनिटांच्या भेटीनंतर शाहरुख खान तेथून रवाना झाला. यावेळी त्याने प्रसारमाध्यमांसमोर काहीही भाष्य करण्यास नकार दिला.

न्यायालयाने बुधवारी जामीन नाकारताना आर्यनच्या व्हॉट्सअ‍ॅप संदेशांचा दाखला दिला. आर्यन आणि अन्य दोन आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग सकृतदर्शनी गंभीर आहे. त्यामुळे जामिनावर असताना तो अशा प्रकारचा गुन्हा पुन्हा करणार नाही हे म्हणता येऊ शकत नाही, शिवाय एनसीबीने प्रकरणाशी संबंधित सादर केलेली कागदपत्रे आणि आर्यन, अरबाज यांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर स्वेच्छेने दिलेल्या जबाबानुसार त्यांनी सेवनासाठी अमलीपदार्थ बाळगल्याचे कबूल केले होते. यावरून अरबाजच्या बुटातून हस्तगत केलेल्या अमलीपदार्थाबाबत त्याला माहिती होती हेच स्पष्ट होते. या बाबी लक्षात घेता आरोपींना जामीन देता येणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले.

केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) सादर केलेल्या पुराव्यांतून आर्यनसह या प्रकरणी अटक करण्यात आलेले सगळे आरोपी हे कटात सहभागी असल्याचे सकृतदर्शनी सहभागी असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे एनडीपीएस कायद्यानुसार कटात सहभाग असल्याचे कलम त्यांना लागू होते असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. तसेच आरोपींनी हा गुन्हा केलेला नाही असे या टप्प्यावर मानणे शक्य नसल्याचेही स्पष्ट केले.

उच्च न्यायालयात धाव

विशेष न्यायालयाच्या निर्णयानंतर काही वेळातच आर्यनच्या वकिलांनी त्याच्या जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यासमोर बुधवारी याचिका सादर करण्यासाठी आर्यनच्या वकिलांनी प्रयत्नही केला. मात्र न्यायालय उपलब्ध होऊ न शकल्याने याचिका गुरुवारी सादर करण्यात येणार आहे. तसेच याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली जाणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai drugs case bollywood actor shahrukh khan reach arthuhr road jail to meet aryan khan sgy

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या