नवाब मलिकांच्या मुलीकडून समीर वानखेडेंचे कथित विवाह प्रमाणपत्र ट्वीट; वडिलांच्या नावाबाबत मोठा खुलासा

मलिक यांच्या मुलीने कथित विवाह प्रमाणपत्र आणि रिसेप्शनसाठी निमंत्रण पत्रिका सादर करून अनेक नवे प्रश्न उपस्थित केले आहेत.

Mumbai Drugs Case Nawab Malik daughter releases Sameer Wankhede alleged marriage certificate reception invite

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक विरुद्ध समीर वानखेडे या वादात आणखी एक नवा पुरावा समोर आला आहे. मलिक यांच्या मुलीने कथित विवाह प्रमाणपत्र आणि रिसेप्शनसाठी निमंत्रण पत्रिका सादर करून अनेक नवे प्रश्न उपस्थित केले आहेत. नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक-खान हिने शनिवारी रात्री विवाह अधिकारी जे.जी. बर्मेडा वांद्रे विवाह निबंधक कार्यालयाकडून द्वारे जारी केलेले विवाह प्रमाणपत्र पोस्ट केले आहे. यात यास्मिन अजीज खान, निखिल छेडा आणि ग्लेन पटेल हे तीन साक्षीदार आहेत. याशिवाय वर समीर वानखेडे आणि वधू डॉ. शबाना कुरेशी यांची स्वाक्षरी आहे.

समीर वानखडे यांच्या लग्नाची पत्रिका निलोफर खान यांनी ट्विट केली आहे. त्यात दाऊद वानखडे यांच्या मुलाचा निकाह असल्याचा उल्लेख आहे. तर नवाब मलिक यांची दुसरी मुलगी सना खान हिने समीर वानखडे यांचे लग्न प्रमाणपत्र ट्विट केले त्यात समीर वानखडे यांची बहीण साक्षीदार आहेत. तर फ्लेचर पटेलचा भाऊ ग्लेन पटेल हा दुसरा साक्षीदार आहे ज्याने सही केली आहे. त्यामुळे आता नवाब मलिक यांच्या नंतर त्यांच्या दोन्ही मुलींनी समीर वानखडे मुस्लिम असल्याचे पुरावे ट्विटरवर शेअर केले आहेत.

निलोफर यांनी ७ डिसेंबर २००६ रोजी संध्याकाळी ७ वाजता निकाह समारंभासह विवाहित जोडप्याच्या लग्नाच्या रिसेप्शन कार्डाची फोटो ट्विट केला आहे. विशेष म्हणजे, वराचे नाव समीर (श्री. दाऊद आणि सौ. जाहेदा वानखेडे यांचा मुलगा) असे छापलेले आहे आणि स्थळ अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला गार्डन आहे.

“सर्व पुरावे असूनही वानखेडे आणि त्यांचे कुटुंबीय नकार देत आहेत, इथे प्रत्येकासाठी आणखी एक पुरावा आहे. समीर दाऊद वानखेडेंच्या विवाहाची निमंत्रण पत्रिका. विचित्र गोष्ट अशी आहे की ज्या व्यक्तीने गृहितकांच्या आधारे अटक करण्याची मागणी केली होती, पण इतके ठाम तथ्य स्वीकारण्यास नकार दिला,” असे निलोफर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

“प्रयत्न करूनही सत्य जास्त काळ लपवता येत नाही. समीर वानखेडेचा इतिहास म्हणजे पेंडोरा बॉक्स आहे आणि सांगाडे आता कोठडीतून बाहेर पडत आहेत. त्यांनी काहीही केले तरी आम्ही संपूर्ण सत्य उघड करू,” असेही निलोफर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यानंतर शनिवारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ.प्रकाश आंबेडकर समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. समीर वानखेडे हिंदू की मुस्लीम या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा एक निकालच वाचून दाखवला आणि त्यानुसार समीर वानखेडे जे म्हणत आहेत ते बरोबर असल्याचं सांगितले. समीर वानखेडे यांनी १८ वर्षे पूर्ण झाल्यावर वडिलांनी स्विकारलेला मुस्लीम धर्म न स्विकारता वडिलोपार्जित हिंदू धर्म स्विकारल्याचं जाहीर केलंय, असंही प्रकाश आंबेडकरांनी नमूद केले

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai drugs case nawab malik daughter releases sameer wankhede alleged marriage certificate reception invite abn