राज्यात सध्या मुंबई ड्रग्ज प्रकरणावरून राजकारण जोरादार तापलं आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. अवघ्या देशाचे लक्ष या सर्व घडामोडींवर आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक यांनी या प्रकरणीच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, वर्षभरातील राज्यातील विविध घटनाक्रमांसह एनसीबीच्या कारवायांबाबत मुख्यमंत्री पंतप्रधांना पत्र लिहिणार आहेत, असंही त्यांनी सांगतिलं आहे.

नवाब मलिक यांनी सांगितले की, “मी दोन दिवस परभणी आणि नांदेडच्या दौऱ्यावर असताना, ज्या काही घडामोडी या क्रुझ ड्रग्ज केसमध्ये झालेल्या आहेत. एका पंचाने प्रतिज्ञापत्राच्या माध्यामातून जो सगळा प्रकार समोर आणलेला आहे, हे धक्कादायक आहे. मी जे आरोप करत होतो, त्यात कुठं तरी भर देणारा हा प्रकार आहे. ज्याप्रकारे मी अगोदरच जाहीर केलं होतं की, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्र्यांना मी भेटणार आहे. आज दोघांना भेटून या प्रकरणी एसआयटी चौकशीच्याबाबत मी त्यांच्याशी बोललो. गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या प्रकरणात बऱ्याच लोकांनी तक्रारी केल्या आहेत. पोलीस विभाग त्याचा तपास करत आहे. तपास करून निश्चितरूपाने यामध्ये गुन्हा दाखल करून त्यावर कारवाई होईल, असं मला आश्वासन देण्यात आलेलं आहे. ”

तसेच, “मला अपेक्षा आहे की एकदा गुन्हा दाखल झाल्यानंतर गोसावी सारखे लोक कसे पैस उकळत आहेत? किंवा कशाप्रकारे ते लोक इतरांना हाताळत आहेत. याबाबतचं सगळं सत्य तपासातून बाहेर येईल. मला वाटतं एकदा एफआयआर दाखल झाल्यानंतर हळूहळू तपास पुढे जाईल.” असंही मलिक म्हणाले.

याचबरोबर, “एफआयआर हा घटनेबाबत होणार आहे, म्हणजे खंडणी वसूल करणे, जे लोक पंच आहे हे फरार असताना आरोपीला हाताळत आहेत. असं देखील सांगण्यात आलं आहे की कोऱ्या कागदावर स्वाक्षरी घेतली. याबाबत सगळा तपास करून कुठला एफआयआर नोंदवायचा हे पोलीस ठरवतील. एफआयआर व्यक्तीच्या विरोधात नाही तर घटना जी आहे त्याबाबत एफआयआर होईल. तपासातून जे जबाबदार असतील, त्यांच्यावर या गुन्ह्याबाबत पोलिसांकडून सत्यता तपासून कारवाई केली जाईल. कुणाला सूडबुद्धीने अडकवायचं अशी भूमिका नाही. पण पंचाचे जे प्रतिज्ञापत्र आहे. त्यामधून बरचसं काही समोर आलेलं आहे. निश्चितपणे त्याचा तपास होईल.” असा विश्वासही नवाब मलिक यांनी यावेळी व्यक्त केला.

बॉलीवूडवर लाखो लोकांचा रोजगार आहे, ते जर बदनाम झालं तर देशाचंही नुकसान –

“गंभीर विषय आहे, मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी सांगितलं की आपल्याला तपासून पुढे कसं जायचं आहे. याबाबत ते निर्णय घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांशी मी बोलत असताना त्यांनी एक चिंता व्यक्त केली, बॉलीवूड ही हॉलीवूडनंतरची जगातली एक मोठी इंडस्ट्री आहे. लाखो लोकांचा त्यावर रोजगार आहे. बॉलीवूड या देशातील संस्कृती जगभर पोहचवत आहे. देशाच्या जीडीपीमध्ये तीन-चार टक्के वाटा आहे. जर या पद्धतीने या इंडस्ट्रीला बदनाम करण्याचं काम झालं तर, याचा परिणाम केवळ यामधील काही अभिनेत्यांवर होणार नाही. लाखो लोकांचा रोजागार यावर आहे. देशाची संस्कृती पुढे जात आहे आणि ही जर बदनाम झाली, मुंबई बदनाम झाली तर हे देशाचं देखील नुकसान आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की याबाबत मी पंतप्रधानांना पत्र लिहिणार आहे. जे काही घटनाक्रम महाराष्ट्रात वर्षभरापासुन सुरू आहेत, त्याबाबत मुख्यमंत्री स्वतः इंडस्ट्रीच्याबाबत त्यांनी जी चिंता दर्शवलेली आहे, ते पंतप्रधानांना पत्राद्वारे कळवतील.” अशी माहिती नवाब मलिक यांनी माध्यमांना दिली.