मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईला आता वेगळं वळण मिळताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक आरोप आणि दावे केले आहेत. समीर वानखेडे यांनी खोटी कागदपत्रं दाखवत नोकरी मिळवली असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. तसंच त्यांच्या पहिल्या लग्नाचे फोटो आणि निकाहनामा समोर आणत ते मुस्लीम असल्याचंही म्हटलं आहे. त्यानंतर समीर वानखेडे यांच्या धर्मासंबंधी चर्चा सुरु असून आता त्यांच्या पहिल्या पत्नीच्या वडिलांनीही काही खुलासे केले आहेत. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीचे वडील डॉक्टर जाहिद कुरेशी यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, “हे लव्ह मॅरेज नसून ठरवून कऱण्यात आलेलं लग्न होतं. आमची कुटुंबं चार-पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होती. ते मुस्लीम असल्याचं माहिती होतं. हिंदू आहेत माहिती असतं तर लग्नच केलं नसतं. यांचं संपूर्ण कुटुंब मुस्लीम आहे. आमच्याकडे आले तेव्हाही ते मुस्लीम म्हणूनच आले होते. हिंदू म्हणून कधी आले नव्हते. ते हिंदू असल्याचं आत्ता आम्हाला माध्यमांकडून कळालं”. समीर वानखेडे तेव्हा युपीएससीसाठी अभ्यास करत होते असंही त्यांनी सांगितलं.




“तलाक झाला असल्याने आम्ही आमचं दु:ख पचवलं होतं. आम्ही कधी कोणाला एक्स्पोज केलं नव्हतं. आम्ही सगळं दु:ख विसरलो होतो,” असंही त्यांनी सांगितलं. त्यांची आई मुस्लीम पद्धतीने सर्व गोष्टी करत होत्या असंही यावेळी ते म्हणाले.
“झायदा यांच्याशी लग्न झालं तेव्हा समीर वानखेडेंच्या वडिलांनी धर्मांतर करत मुस्लीम धर्म स्वीकारला. मुस्लीम धर्म स्वीकारल्याशिवाय लग्न झालं नसतं. ते आधीचे कागदपत्रं दाखवत आहेत. लग्नानंतरचे दाखवत नाहीत. झायदा यांच्याशी लग्न झाल्यानंतर ते दाऊद झाले. ते आधी हिंदू होते का याबद्दल माहिती नाही. पण लग्न केलं तेव्हा दाऊद मुस्लिमच होते,” असा खुलासा त्यांनी केला आहे. समीर वानखेडे यांच्या घऱातही मुस्लीम प्रथा पाळली जात होती असंही त्यांनी सांगितलं.