Aryan Khan Case: शाहरुखच्या मॅनेजरकडे २५ कोटी मागायचे आणि नंतर…; साक्षीदाराने उघड केला खरा प्लॅन

प्रभाकर साईलने केलेल्या आरोपांनुसार, समीर वानखेडेंनी कारवाई झाली त्यादिवशी २ ऑक्टोबरला एका कोऱ्या कागदावर स्वाक्षरी करायला लावली होती

Mumbai Drugs Case, Mumbai Drugs Case Witness, Prabhakar Sail, Shahrukh Khan, SRK, मुंबई ड्रग्ज केस, शाहरुख खान,
प्रभाकर साईलने केलेल्या आरोपांनुसार, समीर वानखेडेंनी कारवाई झाली त्यादिवशी २ ऑक्टोबरला एका कोऱ्या कागदावर स्वाक्षरी करायला लावली होती

बॉलिवूड बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि इतरांना अटक करण्यात आलेल्या क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी रोज नवनवे खुलासे होत असून खळबळ निर्माण करत आहेत. दरम्यान या प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईलने अजून एक खुलासा केला असून किरण गोसावी हे प्रकरण दाबवण्यासाठी शाहरुखच्या मॅनेजरकडे २५ कोटींची मागणी करणार होता. कारवाईत सहभागी असणारा किरण गोसावी आर्यन खानसोबत घेतलेल्या सेल्फीमुळे चर्चेत आला होता. नवाब मलिक यांना आरोपांची मालिका सुरु करताना सर्वात प्रथम किरण गोसावीचं नाव घेतलं होतं. त्यानंतर तो बेपत्ता आहे.

किरण गोसावीचा अंगरक्षक असल्याचा दावा करणाऱ्या प्रभाकर साईलने एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार, किरण गोसावी २५ कोटींची मागणी करणार होता आणि अखेर १८ कोटींवर तयारी दर्शवणार होता. यातील आठ कोटी समीर वानखेडेंना देण्यात येणार होते. याशिवाय प्रभाकर साईलने केलेल्या आरोपांनुसार, समीर वानखेडेंनी कारवाई झाली त्यादिवशी २ ऑक्टोबरला एका कोऱ्या कागदावर स्वाक्षरी करायला लावली होती.

समीर वानखेडे अडचणीत ; लाचखोरीच्या आरोपप्रकरणी चौकशीचे आदेश

“मी साक्षीदार आहे याची मला कल्पना नव्हती. मला बोलावून काही कागदांवर स्वाक्षरी करायला लावली तेव्हाच तिथे गेलो होते. मी जेव्हा कोऱ्या कागदावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला तेव्हा समीर वानखेडेंनी मला काही होणार नाही असं आश्वासन दिलं. किरण गोसीवानेही मला स्वाक्षरी करण्यास सांगितलं. तिथे इतके अधिकारी असताना मी वाद कसा घालणार?,” असं प्रभाकर साईलने म्हटलं आहे.

प्रभाकर साईलने आपल्याला नऊ कोऱ्या कागदांवर स्वाक्षरी करण्यास सांगितलं, तसंच अधिकाऱ्यांनी आपल्या आधार कार्डची प्रत घेतल्याचं सांगितलं आहे. “आपण कागदांवर सही केल्यानंतर आर्यन खानलाही करायला लावण्यात आल्याचं पाहिलं. आर्यन खानला इतरांपासून वेगळं ठेवण्यात आलं होतं. मी व्हिडीओ बनवला आहे त्यात आर्यन गोसावीच्या शेजारी बसलेला दिसत आहे. हे एनसीबी कार्यालयाच्या आतील आहे,” असं प्रभाकर साईलने सांगितलं आहे.

प्रभाकर साईलच्या माहितीनुसार, गोसावी, सॅम डिसूझा आणि शाहरुखची मॅनेजर पूजा यांच्या डील पूर्ण करण्यासाठी कारमध्ये बैठक झाली. “पूजा प्रसिद्ध असल्याने मी तिला ओळखत होता. तिला पाहिल्यानंतर गुगलवर तिचं नावही शोधलं होतं,” असं प्रभाकरने सांगितलं आहे. आपण गोसावी डिसुझाशी बोलत असताना ऐकलं होतं. यावेळी तो आपण शाहरुखच्या मॅनेजरकडे २५ कोटी मागूयात, १८ कोटींवर सेटलमेंट करुयात आणि त्यातून समीर वानखेडेंना देऊयात असं तो सांगत होतो अशी माहिती प्रभाकर साईलने दिली आहे.

प्रभाकरच्या माहितीनुसार, “कारवाईच्या दुसऱ्या दिवशी ३ ऑक्टोबरला त्याला महालक्ष्मी परिसरातून ५० लाखांची रक्कम घेऊन येण्यास सांगण्यात आलं होतं. तिथे पोहोचल्यानंतर दोन लोक होते, त्यांनी बॅग दिल्यानंतर गोसावी आणि त्याची बायको तेथून निघून गेले. ७ ऑक्टोबरला आपण त्याला शेवटचं भेटलो होतो. २१ ऑक्टोबरला त्याने आपल्याला फोन करुन लवकरच आत्मसमर्पण करणार असल्याचं सांगितलं होतं”.

क्रूझ पार्टीआधी गोसावीने आपल्याला काही फोटो देत त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितलं होतं असं साईलने सांगितलं आहे. आपण लवकरच अनेक पुरावे समोर आणणार असल्याचंही त्याने सांगितलं आहे. आपल्याला सुरक्षेची भीती वाटत असल्याचं त्याने म्हटलं आहे. “माझं आयुष्य धोक्यात आहे. पोलीस आठ ते नऊ वेळा माझ्या घरी आले होते. मी पहिला साक्षीदार आहे. दुसरा फरार असून तिसरा भाजपा कार्यकर्ता आहे. मी प्रामाणिक असून कोणीही मला पाठिंबा देत नाही आहे. म्हणूनच मी सुरक्षेची मागणी केली,” असल्याचं प्रभाकरने सांगितलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai drugs case witness alleges plan was to ask shahrukh khan manager for 25 crores sgy

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख