मुंबई : मुंबईत अमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी कक्षासह स्थानिक पोलिसांनी केलेल्या तीन स्वतंत्र कारवायांत चार जणांना अटक करण्यात आली. डोंगरीतून १ कोटी २४ लाख ७० हजार रुपये किमतीचा ३ किलो ५६३ ग्रॅम हायड्रो गांजा, गोरेगाव पूर्वेतून १ कोटी २८ लाख रुपये किमतीचे ६४० ग्रॅम मेफेड्रोन, तर कांदिवली पश्चिमेतून विक्रीसाठी जवळ बाळगलेले मेफेड्रोन जप्त करण्यात आले. या कारवायांत जप्त केलेल्या अंमली पदार्थांचे एकत्रित अंदाजित मूल्य सुमारे २ कोटी ५२ लाख ९५ हजार ५०० रुपये आहे. कांदिवलीतील कारवाईत अंमली पदार्थांसह मोटार आणि अन्य साहित्यही जप्त करण्यात आले.

मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी कक्षाच्या आझाद मैदान पथकाने २८ ऑक्टोबर रोजी डोंगरी परिसरात गस्तीदरम्यान ही कारवाई केली. उमरखाडी क्रॉस लेन परिसरात दोन व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरताना पोलिसांच्या निदर्शनास आल्या. संशय आल्याने पोलिसांनी दोघांना थांबवून पिशव्यांची झडती घेतली. या झडतीत एकूण ३ किलो ५६३ ग्रॅम हायड्रो गांजा आढळून आला. या अंमली पदार्थांचे अंदाजित बाजारमूल्य १ कोटी २४ लाख ७० हजार ५०० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दुसऱ्या कारवाईत दिंडोशी पोलिसांनी गोरेगाव पूर्वेकडील फिल्म सिटी रोडवरील हनुमान नगर परिसरात मेफेड्रोन जप्त केले. पोलिसांचे पथक सॅटेलाइट टॉवर परिसरात गस्त घालत असताना एक व्यक्ती संशयास्पद वाटला. पोलिसांनी त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्या पिशवीत ६४० ग्रॅम मेफेड्रोन आढळून आले. या अंमली पदार्थाचे अंदाजित मूल्य १ कोटी २८ लाख रुपये आहे.

तिसऱ्या कारवाईत चारकोप पोलिसांनी कांदिवली पश्चिमेतील साईधाम नगरजवळ, पोलिसांनी इनोव्हा मोटार अडवून तपासणी केली. या कारवाईत वासुदेव लक्ष्मण पाटील ऊर्फ मामा (५५) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे १०.३२ ग्रॅम मेफेड्रोन आढळून आले. त्याची अंदाजित किंमत २५ हजार रुपये आहे. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी गुन्हा नोंदवला.

तिन्ही कारवाईमध्ये जप्त केलेल्या अंमली पदार्थांचा पुरवठा कुठून झाला, त्यामागे आणखी कोण सहभागी आहे आणि मुंबईतील विक्रीसाठी त्यांचे जाळे कार्यरत होते का, याचा तपास संबंधित पोलीस करत आहेत.