मुंबई : मदयपान करुन गाडी चालवणाऱ्यांविरुद्ध गेल्या एप्रिल महिन्यापासून वाहतूक पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यास, वाहन परवाने रद्द आणि वाहने जप्त करण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षी ३ हजार ६४० चालकांवर गुन्हे दाखल करुन २ हजार ३२६ चालकांचा वाहन परवाना रद्द केला. यंदा जानेवारी ते ६ एप्रिल दरम्यान १ हजार ८३२ चालकांवर गुन्हा दाखल केला.

वाहतूक पोलिसांनी २०२३ मध्ये २ हजार ५६२ मद्यधुंद चालकांना पकडले होते. मद्यपान करून वाहन चालवल्याप्रकरणी पहिल्या गुन्ह्यासाठी दंडाची रक्कम २ हजार रुपयांवरून १० हजार केली. त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी दंडाची रक्कम १५ हजारांपर्यत वाढवली. तरीही २०२४ मध्ये मद्यधुंद चालकांची संख्या ९ हजार ४६२ पर्यंत वाढली. फक्त दंडाची रक्कम पुरेशी नसल्याचे निदर्शनास आल्याने वाहतूक पोलिसांनी एप्रिल २०२५ पासून भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवून परवाने रद्द करण्यास सुरुवात केली. वाहतूक पोलिसांचा गुन्हा नोंदविण्याचा निर्णय प्रभावी ठरला. एप्रिल ते डिसेंबर २०२५ दरम्यान दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल ३ हजार ६४० चालकांवर एफआयआर दाखल झाले. २०२४ वर्षाच्या तुलनेत २०२५ मध्ये मदयपान करुन वाहन चालविणाऱ्यांमध्ये ४० टक्के घट झाली.

एफआयआरची आवश्यकता का

७ जुलै, २०२४ रोजी, मिहिर शाह याने मद्यधुंद अवस्थेत वरळी सी-फेसवर भरधाव वेगाने गाडी चालवत असताना एका स्कूटरवरील दाम्पत्याला धडक दिली. अपघातात दुचाकी चालक प्रदीप नाखवा गाडीच्या बोनेटवर पडले, तर त्यांच्या पत्नीला कारने जवळपास २ किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याने तिचा मृत्यू झाला. घटनेच्या दोन दिवसांनंतर शाहला अटक करण्यात आली. या घटनेनंतर, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. तसेच रात्री आणि आठवड्याच्या शेवटी तपासणी वाढवण्याची गरज अधोरेखित केली होती.

तीन वर्षांतील कारवाई

वर्षकारवाईएफआयआर
२०२३२,५६२००००
२०२४९,४६२००००
एप्रिल ते डिसेंबर २०२५३७१८३,६४०
१ जानेवारी ते ६ एप्रिल २०२६१,९६९१,८३२

एफआयआर नोंदवल्याने वाहनचालकांना पासपोर्ट, व्हिसा आणि नोकरीसाठी आवश्यक असलेले पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळवण्यात अडथळा निर्माण होतो.

शिक्षा काय

पहिल्या गुन्ह्यासाठी सहा महिन्यांपर्यंत कारावास किंवा १० हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात येतो.दुसऱ्या किवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी, दोन वर्षांपर्यंत कारावास, किंवा १५ हजार रुपयांपर्यंत दंड, किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरिता एप्रिल २०२५ पासुन मदयपान करुन वाहन चालविणाऱ्या चालकांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षी ३,६४० चालकांवर गुन्हे दाखल केले. २,५८७ चालकांचे परवाने रद्द करण्यासाठी परिवहन विभागाशी पत्रव्यवहार केला. त्यापैकी २,३२६ चालकांचे परवाने रद्द केले. – अनिल कुंभारे, पोलिस सहआयुक्त, वाहतूक.

शिक्षा हवीच…

वाहतूक नियमांचे उल्लंघन जीवनाच्या धोक्याच्या आधारावर श्रेणीमध्ये विभागले पाहिजे. उदाहरणार्थ, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे आणि अत्यंत वेगवान वाहन चालवणे हे मद्यधुंद वाहन चालवण्याप्रमाणेच अति धोकादायक गुन्हे म्हणून वर्गीकृत करायला हवेत. अशा गुन्हेगारांना केवळ चलन देऊन सोडून दिले जाऊ नये, असे वाहतूक तज्ज्ञांचे मत आहे