मुंबईः गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडवा यासाठी मुंबई वाहतूक पोलिसही सज्ज झाले असून नागरिकांच्या सुविधेसाठी गणेशोत्सव काळात ६ ते १८ सप्टेंबरदरम्यान धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्ग वाहतुकीसाठी २४ तास खुला ठेवण्यात येणार आहे. याशिवाय पूर्व मुक्त मार्ग, अटलसेतुकडून दक्षिण मुंबईमार्गे उत्तर मुंबईकडे जाण्याकरीता पूर्व मुक्त मार्ग, पी. डिमेलो मार्ग, कल्पना जंक्शन, सी.एस.एम.टी. जंक्शन - महापालिका मार्ग - मेट्रो जंक्शन या मार्गिकेचा वापर करून सागरी किनारा मार्गापर्यंत यावे. तसेच उत्तर मुंबईकडून दक्षिण मुंबईमार्गे पूर्व मुक्त मार्ग, अटल सेतूकडे जाण्याकरीता वाहन चालकांनी सागरी किनारा मार्ग दक्षिण वाहिनी, प्रिंसेस स्ट्रीट उजवे वळण श्यामलदास जंक्शन - श्यामलदास मार्ग डावे वळण मेट्रो जंक्शन महापालिका मार्ग उजवे वळण - सी. एस.एम.टी. जंक्शन - डावे वळण भाटिया बाग जंक्शन डावे वळण कल्पना जंक्शन - पी. डिमेलो मार्ग - पूर्व मुक्त मार्ग, अटल सेतू दक्षिण वाहिणीचा वापर करावा, अशा सूचना वाहतूक पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत. हेही वाचा - डेटिंग ॲप फसवणूकप्रकरणी सहा जणांना अटक, सर्व आरोपी नवी दिल्लीतील रहिवासी धोकादायक पुलावरून गणेश विसर्जन मिरवणूक नेताना काळजी घ्यावी. जुन्या तशाच धोकादायक पुलावरून १०० पेक्षा अधिक व्यक्ती विसर्जन मिरवणुकी वेळी जाणार नाहीत. विसर्जन मिरवणूक जुन्या, तसेच धोकादायक पुलावर थांबणार नाहीत याची काळजी घ्यावी, तसेच ध्वनीक्षेपकाचा वापर करून अथवा नृत्य करू नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. मुंबईतील घाटकोपर रेल ओव्हर पूल, करीरोड रेल ओव्हर पूल, चिंचपोकळी रेल ओव्हर पूल, भायखळा रेल ओव्हर पूल, मरीन लाईन्स रेल ओव्हर पूल, सॅडहर्स्ट रोड रेल ओव्हर पूल, फ्रेंच रेल ओव्हर पूल, केनडी रेल ओव्हर पूल, फॉकलन्ड रेल ओव्हर पूल, महालक्ष्मी स्टील रेल ओव्हर पूल, प्रभादेवी - कॅरोल रेल ओव्हर पूल, दादर टिळक रेल ओव्हर पूल आदी पुलांचा यात समावेश आहे. याशिवाय अत्यावश्यक वस्तू सोडून इतर वस्तू घेऊन येणाऱ्या अवजड वाहनांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. दक्षिण मुंबईमध्ये प्रवेश करण्यास व रस्त्यावर धावण्यास गणेशोत्सव काळात ९, १२, १३, १४ व १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० ते दुसऱ्या दिवशी सकाळी ८.०० वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. वाहतुकीचे निर्बंध असलेल्या महत्त्वाच्या मार्गिका नाथालाल पारेख मार्ग, कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग, रामभाऊ साळगावकर मार्ग, जे. एस. एस. रोड, विठठ्ठलभाई पटेल मार्ग, बाबा साहेब जयकर मार्ग, राजा राम मोहन रॉय रोड, कावसजी पटेल टँक रोड, पंडिता रमाबाई मार्ग, दादासाहेब भडकमकर मार्ग वाहतुकीसाठी आवश्यकतेनुसार बंद ठेवण्यात येणार आहे. याशिवाय नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग (आवश्यकतेनुसार), महापिलाक मार्ग (१७ सप्टेंबरला आश्यकतेनुसार), एस. व्ही. पी. रोड, संत सेना मार्ग, नानुभाई देसाई रोड, सरदार वल्लभभाई पटेल रोड, जिनाभाई मुलजी राठोड मार्ग, पी. डिमेलो रोड अनंतचतुर्दशीला बंद ठेवण्यात येणार आहे. गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, जुहू चौपाटी, मालाड मालवणी टी जंक्शन आणि गणेश घाट पवई यांसारख्या महत्त्वाच्या विसर्जनाच्या ठिकाणी मुंबई शहर वाहतूक पोलिसांचे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. या ठिकाणी जोडणाऱ्या मार्गिका विसर्जनाच्या वेळी बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच येथे वाहने उभी करण्यासही निर्बंध घालण्यात आले आहे. तसेच आवश्यकतेनुसार काही एक दिशा मार्गांवर दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. हेही वाचा - Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाची पहिली झलक समोर, बाप्पाचं मोहक रुप पाहण्याकरता भक्तांची गर्दी! गणेश विसर्जनादरम्यान वाहतुकीचे नियमन व नियंत्रण करण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी निरीक्षण मनोरे उभे करण्यात आले आहेत. याशिवाय २१ मार्गांवर मालवाहू वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. दादरमधील ज्ञानेश्वर मंदिर मार्ग, जांभेकर महाराज मार्ग, स्वातंत्रवीर सावरकर मार्ग, संपूर्ण केसकर रोड, एम. बी. राउत रोड, टिळक ब्रिज, एस. के. बोले रोड हे मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. जुहू येथील देवळे रोड, जूहुतारा रोड हे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.