मुंबई : टाटा कॅन्सर रुग्णालयामागील खारघर – तुर्भे बोगद्याच्या मार्गावरील टेकड्यांवरील खाणींमधून परिसरात धुळीचे लोट पसरत असून त्यामुळे प्रदुषणाचा धोका वाढत आहे. दरम्यान, यासंदर्भात तातडीने कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेल पाठवून केली आहे.रुग्णालयातील प्रगत कर्करोग उपचार उपकरणांसाठी धूळ घातक असून, रुग्णांसाठी ही बाब अत्यंत गंभीर आहे. यापूर्वी टाटा रुग्णालयाच्या संचालकांनी यासंदर्भात सरकारकडे तक्रार केली होती, त्यानंतर काही काळ खाणी बंद झाल्या होत्या.

मात्र आता पुन्हा खाणींमध्ये स्फोट करण्यात येत असून परिसरात धुळीचे लोट पसरत आहेत, अशी माहिती खारघर हिल अँड वेटलँड फोरमच्या ज्योती नाडकर्णी यांनी दिली. याचबरोबर या खाणींमुळे वन विभाग विकसित करीत असलेल्या पांडवकडा धबधब्यालाही धोका निर्माण झाला असून, खारघर-तुर्भे लिंक रोडसाठी बांधण्यात येत असलेला बोगदाही कमकुवत होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, सर्वोत्तम शहर म्हणून नवी मुंबई शहराला पसंती दिली जात आहे. त्यामुळे तेथे झपाट्याने विकास होत असून महामुंबई उदयास येत आहे. असे असले तरी दुसरीकडे या शहरात दिवसेंदिवस अतिखराब, अशुद्ध हवेचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत येथील हवेचा दर्जाही खालावला होता. २०२२ मध्ये स्वच्छता सर्वेक्षणात नवी मुंबई शहराने देशात तिसरा क्रमांक पटकावला असला तरी राष्ट्रीय वायू गुणवत्ता निर्देशांक- केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने संकेतस्थळावर जाहीर केलेल्या निर्देशांक मूल्यातून नवी मुंबईची हवा अति खराब असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्याचबरोबर नवी मुंबई शहरात मोठया प्रमाणावर विकास कामे सुरू आहेत. त्यामुळेही हवेत धुळीचे प्रमाण वाढत आहे.

दरम्यान, खाणीसाठी पर्यावरणीय मंजुरी आवश्यक असल्याचे निर्देश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिले आहेत. मात्र तरीही खारघरमधील खाणींना परवानगी कशी दिली जाते, असा सवाल पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे. तसेच खाणीला पूर्वपरवानगी देण्यापूर्वी सखोल पर्यावरणीय परिणामांचे मूल्यांकन करणे अनिवार्य आहे, असे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे. एकूण पार्श्वभूमी लक्षात घेऊन खारघरमधील खाणी तात्काळ बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या काही वर्षांत प्रदूषणात वाढ

गेल्या काही वर्षांपासून नवी मुंबई शहरात दिवसेंदिवस हवा प्रदुषण वाढत आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदुषण मंडळाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. एमआयडीसीमधील औद्योगिक कंपन्या रासायन मिश्रित हवा कोणतीही प्रक्रिया न करता बाहेर सोडून दिली जाते. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.