लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील खड्डे, तडे आणि उखडलेल्या पृष्ठभागामुळे या महामार्गांवर तासनतास वाहतूक कोंडी होते. त्यावर तोडगा म्हणून या ”मायक्रो सर्फेसिंग”सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रस्त्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून पावसाळ्यापूर्वीच हे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी सर्व करांसह सुमारे १६४ कोटी ९४ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीच्या पटलावर ठेवण्यात आला असून बुधवारी यावर निर्णय होईल.
पूर्व द्रुतगती महामार्गाची एकूण लांबी १९ किलोमीटर असून, रुंदी ६० मीटर इतकी आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग २६ किलोमिटर लांब, सरासरी ४२ मीटर रुंद आहे. हे दोन्ही महामार्ग मुंबईसाठी अत्यंत महत्वपूर्ण असून त्यावरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून २०२२ मध्ये पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्ग देखभाल व सुधारणा करण्याच्या उद्देशाने मुंबई महापालिकेस हस्तांतरित करण्यात आला आहे. या मार्गावर गाड्यांची मोठी वर्दळ असते. मात्र, सातत्याने होणाऱ्या वाहतुकीमुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच, काही ठिकाणी रस्त्याचा पृष्ठभाग उखडला असून तडे गेल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत होती.
महामार्गाच्या दुरुस्तीसाठी दीर्घकालीन उपाय सुचविण्यासाठी महापालिकेने आयआयटी मुंबईची नेमणूक केली. महामार्गांच्या सर्व बाबींचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर आयआयटी मुंबईने मायक्रो सर्फेसींग पद्धतीचा वापर करण्याची शिफारस केली. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कमी वेळात रस्त्यांची दुरुस्ती करणे शक्य होते. त्यामुळे महापालिकेने दोन्ही महामार्गाच्या मायक्रो सर्फेसींग तंत्रज्ञान वापरून दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. या तंत्रज्ञानामुळे केवळ दोन तासांत रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध होईल, असा दावा महापालिकेने केला. या कामांतर्गत १२० मिमिपर्यंत रस्त्यावरील डांबराचा थर काढून टाकला जाईल. त्यानंतर पॉलिमर बिटुमेन काँक्रिट वापरून ६ ते ८ मिमी जाडीचे मायक्रो सर्फेसिग करण्यात येणार आहे.
महापालिकेने पूर्व द्रुतगती महामार्गासाठी ६० कोटी ६२ लाख ५२ हजार ४४४ रुपये, तर पश्चिम द्रुतगती महामार्गासाठी ६९ कोटी ३२ हजार १५० एवढा अंदाजित खर्च काढला होता. त्यासाठी महापालिकेचे नोंदणीकृत कंत्राटदार, पीडब्ल्यूडी, भारत सरकारमान्य शासकीय, निमशासकीय संस्थांकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या सुधारणा कामांसाठी मे. मारकोलाईन्स पेवमेन्ट टेक्नॉलॉजिस लिमिटेड संस्थेची नेमणूक करण्यात आली.
पूर्व द्रुतगती महामार्गासाठी सर्व करांसह ७७ कोटी १४ लाख २९ हजार ९७३ रुपये , तर पश्चिम द्रुतगती महामार्गावरील सुधारणा कामांसाठी ८७ कोटी ८० लाख ३६ हजार २१ रुपये असे मिळून एकूण १६४ कोटी ९४ लाख ६५ हजार ९९४ रुपये खर्च करण्यात येणार आहेत. दोन्ही कामांसाठी एकाच कंत्राटदाराच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने स्थायी समितीच्या सभेत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, ३० दिवसांच्या आत स्थायी समितीने प्रस्ताव निकालात न काढण्यास स्थायी समितीने पूर्व मंजुरी दिल्याचे समजून महापालिका कामाला सुरुवात करणार आहे.
