Elevated Nature Trail Mumbai booking guide: मुंबईतील मलबार हिल एलिव्हेटेड नेचर ट्रेल (Malabar Hill Elevated Nature Trail) हा सिंगापूरच्या ‘ट्रीटॉप वॉक’च्या धर्तीवर तयार करण्यात आलेला मुंबईतील पहिलाच ‘उंच’ निसर्ग मार्ग आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात या नेचर ट्रेलचे उद्घाटन झाले असून येथे भेट देण्यासाठी मुंबईकरांची गर्दी वाढली आहे. सुमारे ४८५ मीटर लांबीचा हा लाकडी वॉकवे जमिनीपासून सुमारे २०-२५ फूट उंचावर असून, तो १२ एकरच्या घनदाट शहरी जंगलातून जातो.

    मुंबई महानगरपालिकेने मुंबईचा पहिला उन्नत निसर्ग पायवाट प्रकल्प उभारला असून, तो सिंगापूरमध्ये विकसित केलेल्या ट्री टॉप वॉकच्या धर्तीवर आहे आणि मुंबईत पहिल्यांदाच विकसित करण्यात आला आहे. हा मार्ग जुन्या मार्गाच्या पायवाटेला समांतर पण उंचावरून जातो. येथे १०० हून अधिक प्रजातींची झाडे (उदा. आंबा, फणस, वड, पिंपळ, गुलमोहर) आणि विविध प्रकारचे पक्षी (उदा. किंगफिशर, बुलबुल, पोपट) पाहायला मिळतात.

    ट्रेलवर एक ‘सी व्ह्यूइंग डेक’ आणि ‘ग्लास-बॉटम डेक’ आहे, येथून गिरगाव चौपाटी, अरबी समुद्र आणि मुंबईच्या स्कायलाईनचे विहंगम दृश्य दिसते. झाडांना धक्का न लावता स्टीलचे खांब आणि लाकडी डेक वापरून हा मार्ग बनवण्यात आला आहे.

    शुल्क आणि बुकिंग कुठून कराल?

    दररोज सकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत हा मार्ग खुला असतो. भारतीय नागरिकांना प्रति व्यक्ती २५ रुपये तर, विदेशी नागरिकांना प्रति व्यक्ती १०० रुपये शुल्क आकारले जाते. प्रवेशासाठी अधिकृत https://naturetrail.mcgm.gov.in/ पोर्टलवरून ऑनलाइन बुकिंग करणे अनिवार्य आहे. गर्दी टाळण्यासाठी एका तासाच्या स्लॉटमध्ये फक्त २०० पर्यटकांनाच प्रवेश दिला जातो.

    कसं पोहोचाल?

    हे नेचर ट्रेल मलबार हिलमध्ये कमाल नेहरु पार्कच्या मागे सिरी रोड येथे आहे. पश्चिम रेल्वेवरील ग्रँट रोड किंवा चर्नी रोड ही जवळची स्थानके आहेत. तिथून टॅक्सी किंवा बसने मलबार हिलला जाता येते. चर्नी रोड किंवा ग्रँट रोडवरून १०५, १०८ किंवा ११२ क्रमांकाच्या बसने हँगिंग गार्डन/कमला नेहरू पार्कपर्यंत पोहोचता येते.ट्रेलच्या प्रवेशद्वारावर पार्किंगची सोय नाही. पर्यटकांना आपली वाहने कमला नेहरू पार्क किंवा हँगिंग गार्डनच्या पे-अँड-पार्क सुविधेत उभी करावी लागतात.