Mumbai elevator gas balloon explosion video: मुंबईतून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. गॅस फुगे घेऊन एकाने लिफ्टमध्ये प्रवेश केला. लिफ्टमध्ये प्रवेश करताच गॅस फुग्यांचा मोठा स्फोट झाला आणि आगीच्या ज्वाळा पसरल्या. यामुळे लिफ्टमध्ये असणाऱ्या इतरांची तारांबळ उडाली. गोरेगावमधील रहिवासी इमारतीत ०२ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली, यात दोनजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
गॅसने भरलेले फुगे
समोर आलेल्या व्हिडिओनुसार, लिफ्टमध्ये महिला ट्रॅली घेऊन प्रवेश करते. यानंतर एक व्यक्ती काही फुगे घेऊन लिफ्टमध्ये प्रवेश करतो, त्यापाठोपाठ आणखी एकजण लिफ्टमध्ये प्रवेश करतो. दरम्यान, व्यक्तीच्या हातातील फुग्यांचा मोठा स्फोट होतो आणि आग पकडतात. यामुळे घाबरलेल्या लिफ्टमधील सर्वांनी बाहेर पळ काढल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
अन् अनर्थ टळला
फुग्यांचा स्फोट झाल्याने लिफ्टमध्ये सर्वत्र आगीच्या ज्वाळा पसरतात. यामुळे घाबरलेल्या लिफ्टमधील सर्वांनी बाहेर धाव घेतली. लिफ्टचे दार बंद होत असताना झालेल्या स्फोटामुळे दार पुन्हा उघडलंं आणि सर्वांनी बाहेर धाव घेतली. यात दोघे जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, लिफ्टचे दार वेळेवर उघडले नसते तर मोठा अनर्थ झाला असता, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
या घटनेचा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लिफ्टचे दार बंद झाले असते तर कोणालाच बाहेर पडता आले नसते आणि मोठा अनर्थ घडला असता अशी भीती व्यक्त केली जात आहे. वाढदिवस, पार्टी किंवा इतर कार्यक्रमासाठी हे फुगे नेले जात होते, अशी माहिती आहे.
गॅस फुग्यांबाबत काळजी घेण्याचे आवाहन
विविध कार्यक्रमांसाठी गॅसचे फुगे वापरण्याचे प्रमाण खूप आहे. दरम्यान, गॅस फुग्यांचा वापर करताना योग्य काळजी घेण्याची गरज असल्याचे मत अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना व्यक्त केली. गॅस फुगे ज्वालाग्रही असल्याने ते धोकादायक असतात असे अनेकांनी मत नोंदवले आहे.

