मुंबई : मुंबईतील ९९ हजार ४३५ अधिकृत फेरीवाल्यांना येत्या १० जूनपर्यंत महापालिकेकडून क्यू आर कोड असलेले ओळखपत्र देण्यात येणार असल्याची ग्वाही उपमहापौर संजय घाडी यांनी दिली. महापालिकेत सत्तेवर येताच फेरीवाल्यांना ओळखपत्र देण्याची संकल्पना भाजपने मांडली होती. मात्र प्रत्यक्षात ओळखपत्र देण्याची घोषणा उपमहापौरांनी करून एक प्रकारे भाजपवर कुरघोडी केल्याची चर्चा सुरू आहे. फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना (शिंदे) यांच्यात समन्वय नसल्याचेच उघड झाले आहे.

मुंबईत फेरीवाल्यांवर सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधात शिवसेना (शिंदे) पक्षाचे माजी खासदार संजय निरुपम आणि उपमहापौर संजय घाडी यांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांची मंगळवारी भेट घेतली.

मुंबई शहरांमध्ये ९९ हजार ४३५ एवढे नोंदणीकृत फेरीवाले असून त्यांना क्यू.आर.कोड असलेले ओळखपत्र मुंबई महानगरपालिकेने त्वरित द्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे घाडी यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे (शिंदे) गटनेते अमेय घोले, सुधार समितीच्या अध्यक्षा संध्या दोशी, विधि समितीच्या अध्यक्षा दीक्षा कारकर व मुंबई शहरातील अधिकृत फेरीवाल्यांच्या विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

आयुक्तांच्या भेटीनंतर निरुपम आणि घाडी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी उपमहापौरांनी ही माहिती दिली. मुंबईत बांगलादेशी घुसखोर फेरीवाल्यांच्या नावाखाली उत्तर भारतीय, गुजराती आणि स्थानिक मराठी फेरीवाल्यांना जाणीवपूर्व लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप संजय निरुपम यांनी यावेळी केला. मुंबई महानगरपालिका प्रशासनच या सर्व प्रकाराला जबाबदार असून प्रशासनाला अद्याप एकही बांगलादेशी फेरीवाला शोधता आलेला नाही, असा दावाही यावेळी त्यांनी केला. मुंबईत २०१४ पासून फेरीवाला कायद्याची अद्याप पूर्ण अंमलबजावणी झालेली नाही.

न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई ‘ना फेरीवाला’ क्षेत्र म्हणून जी २० ठिकाणे घोषित करण्यात आली होती, ती २० ठिकाणे सोडून अन्य ठिकाणी फेरीवाला विभाग घोषित करून तेथे फेरीवाल्यांना व्यवसाय करायला द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने आयुक्तांकडे केली.

तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार

लवकरात लवकर शहर फेरीवाला समिती स्थापन करून त्याची अंमलबजावणी करावी, अशीही मागणी करण्यात आली.मुंबईत ४० टक्के फेरीवाले हे मराठी भाषिक आहेत. फेरीवाल्यांच्या मुद्द्याला भाषिक रंग देण्याची गरज नाही, असे यावेळी निरुपम म्हणाले. बोरिवलीच्या आमदारांनी एक स्थानिक मराठी फेरीवाल्याचा व्यवसाय बंद पाडण्याचा आरोप त्यांनी केला. याचबरोबर प्रशासनाकडून बांगलादेशी फेरीवाल्यांची कोणतीही आकडेवारी मिळाली नसल्याचे यावेळी संजय निरुपम म्हणाले.

एकाबाजूला बांग्लादेशी फेरीवाले वाढल्याचा आरोप भाजपने केलेला असताना शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी केलेले आरोप पूर्णत: विरोधाभास निर्माण करणारे आहेत.गेल्या साडेतीन महिन्यांपासून फेरीवाल्यांकडे व्यवसाय नाही – उपमहापौर संजय घाडी

जेव्हापासून फेरीवाल्यांविरोधात या कारवाया सुरू झाल्या आहेत, तेव्हापासून मुंबईतील अधिकृत फेरीवाल्यांकडे कोणताही व्यवसाय नाही. अशावेळी त्यांच्यावर होत असलेली कारवाई ही अन्यायकारक असून अधिकृत परिवारांना व्यवसाय करण्याची परवानगी मिळायलाच हवी.या सर्व फेरीवाल्यांना व्यवसाय करण्याची परवानगी मिळाली नाही तर शिवसेना आंदोलन करेल, असा इशारा संजय घाडी यांनी दिला.