मुंबई : मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविल्यानंतरही मुंबईत नवीन झोपड्या वाढत आहेत. अतिक्रमणांना, नव्या झोपड्यांना रोखण्यासाठी झोपु प्राधिकरणाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ‘नेत्रम’ (नेटवर्क फाॅर अन्क्रोचमेन्ट ट्रेकिंग अँड रिपोर्टींग फाॅर मुंबई) पोर्टल तयार केले. या पोर्टलच्या माध्यमातून अत्याधुनिक पद्धतीने अतिक्रमणांवर नजर ठेवली जाणार असून अतिक्रमणांविरोधात कारवाई केली जाणार आहे.
या पोर्टलच्या चाचणीदरम्यान २०११ – २०२५ दरम्यान मुंबईत मोठ्या संख्येने अतिक्रमण वाढल्याची बाब समोर आली आहे. पोर्टल चाचणीचा हा अंदाज असला तरी तो मुंबईची चिंता वाढविणारा आहे. या काळात मुंबईतील सर्वच विभागात अतिक्रमणे वाढली असून मालाड, मालवणीत सर्वाधिक अतिक्रमणे आढली आहेत. २०११ – २०२५ दरम्यान मालवणीत ६ हेक्टरहून अधिक जागा अतिक्रमणाने व्यापली आहे.
झोपु प्राधिकरणाच्या झोपु योजनेनंतर मुंबईतील झोपड्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. त्यामुळे झोपु प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी नव्याने उभ्या राहणाऱ्या अनधिकृत झोपड्या, अतिक्रमणांना रोखण्यासाठी काय करता येईल याचा विचार सुरू केला. त्यातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार नवीन अतिक्रमणे शोधून काढण्यासाठी, तसेच नव्याने अतिक्रमणे होऊ नये यावर नजर ठेवण्यासाठी गुजरातमधील भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट फाॅर स्पेस ॲप्लीकेशन्स अँड जिओइन्फाॅर्मेटीक्स (बीआयएसएजी-एन) या तांत्रिक संस्थेच्या मदतीने ‘नेत्रम’ पोर्टल विकसित करण्यात आले. ‘नेत्रम’ पोर्टलची चाचणी झोपु प्राधिकरणाच्या मुख्यालयात विशेष कक्षात सुरू आहे.
या चाचणीदरम्यान २०००, २०११, २०१७, २०२१ आणि २०२५ दरम्यानच्या मुंबईतील सर्व विभागातील सॅटेलाईट छायाचित्रे उपलब्ध करून घेऊन त्यांची तुलना, तापसणी अभ्यास करण्यात आला. या चाचणीत २०११ ते २०२५ या काळात मुंबईला अतिक्रमणाचा विळखा पडल्याचा अंदाज समोर आल्याची माहिती झोपु प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मुंबईतील सर्वच विभागात अतिक्रमणे, झोपड्या वाढल्या आहेत. त्यातही मालवणी, पहाडी गोरेगाव, देवनार, मानुखुर्द, कुर्ला, मिठागरांच्या जागा अशा ठिकाणी सर्वाधिक अतिक्रमणे आढळून येत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
मालवणीत सर्वाधिक अंदाजे ६.१४ हेक्टर जागेवर अतिक्रमण झाले आहे. तर पहाडी गोरेगावमध्ये अंदाजे एक हेक्टरहून अधिक जागेवर, आकुर्ली येथे अंदाजे ५.९८ हेक्टर जागेवर, तर देवनार येथे अंदाजे ३.१ हेक्टर जागेवर अतिक्रमण झाल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. महत्त्वाचे म्हणजे अधिकाधिक ठिकाणी खाडी बुजवत अतिक्रमण करण्यात आले आहे.
मुंबईत वाढणारा अतिक्रमणाचा विळखा चिंता वाढविणारा असून अतिक्रमणांना रोखण्याचे आव्हान झोपुसह सर्व सरकारी प्राधिकरणांसमोर उभे ठाकले आहे. दरम्यान ‘नेत्रम’ पोर्टल लवकरच अधिकृतरित्या कार्यान्वित केले जाणार आहे. जानेवारी २०२६ मधील मुंबईचे सॅटेलाईट छायाचित्र घेण्यात येणार आहे. जून-जुलै २०२६ मध्ये पुन्हा नव्याने सॅटेलाईट छायाचित्र घेऊन त्याचा तुलनात्मक अभ्यास करून नवीन अतिक्रमणे शोधून काढली जाणार आहेत. तर सक्षम प्राधिकरणाच्या माध्यमातून अशा अतिक्रमणांवर कारवाई केली जाणार आहे. ‘नेत्रम’मुळे अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
