रविवार म्हणजे मुंबईकरांसाठी निवांतवार.. रोज सकाळी उठून लोकल पकडायची घाई नाही की तिकीट-कूपनसाठी रांग लावायची घाई नाही.. पण कालचा रविवार त्याला अपवाद ठरला. देशातील पहिल्यावहिल्या मोनोरेलची पहिलीवहिली सफर करण्याचा मान मिळवण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी केली होती. एरव्ही चौपाटी, मॉल्स, मल्टिप्लेक्स आदी ठिकाणी सुटीच्या दिवशी गर्दी करणाऱ्या मुंबईकरांनी मोनोरेलच्या स्थानकांवर तिकिटांसाठी रांगा लावल्या होत्या!
वडाळा ते चेंबूर या ८.९ किलोमीटर लांबीच्या मार्गावर धावणाऱ्या भारतातल्या पहिल्या मोनोरेलच्या प्रवासाचा अनुभव ‘याची देही..’घेण्यासाठी सकाळपासूनच मुंबईकरांनी तुफान गर्दी केली होती. अर्थात ही गर्दी प्रवासासाठी नव्हती तर गंमत म्हणून मोनोचा अनुभव घेण्यासाठी होती. प्रवाशांचे भाबडे प्रश्न, उत्साह, कर्मचाऱ्यांचाही मोनोचे व्यवस्थापन करण्यातला नवखेपणा रविवारी स्पष्टपणे जाणवत होता. रविवारी सकाळी ७ वाजता मोनोरेल धावेल, असे जाहीर करण्यात आल्याने वडाळा डेपोत सकाळी ६ पासूनच लोकांनी रांगा लावल्या होत्या. वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, छायाचित्रकारांची खच्चून गर्दी होती. वडाळा डेपो हा विभाग शीव प्रतीक्षानगरला लागून असल्याने या भागातील रहिवाशांची संख्या अधिक होती. सुरुवातीला सर्वाना जिन्याखाली थांबवून ठेवण्यात आले. थेट सात वाजताच सर्वांना वर सोडल्याने एकच गलका झाला. मात्र, मोनोरेलच्या स्थानकात पाय ठेवताच एका वेगळ्या विश्वात आल्याचा आनंद प्रवाशांच्या चेहऱ्यावर दिसू लागला.
तिकिटांसाठी रांगा
तिकिटासाठी प्रचंड गर्दी उसळली. त्यामुळे दुसरी खिडकी उघडण्यात आली. तिकीट म्हणून कूपन देण्यात येत होते. पैसे घेऊन यंत्रातून कॉइन काढण्यास नवख्या कर्मचाऱ्यांना वेळ लागत होता. त्यामुळे प्रवाशांची आरडाओरड सुरू झाली. त्यातच सव्वासातला मोने सोडण्यातआली. हा ऐतिहासिक क्षण टिपण्यासाठी आलेल्या माध्यम प्रतिनिधींचा भरणाच जास्त होता.
प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न
एरव्ही कागदी तिकिटाची सवय असलेल्या प्रवाशांना प्रथमच नाण्यांसारखे कूपन मिळत होते. परतीचे तिकीट नसल्याने वडाळ्याहून आलेल्या प्रवाशांनी मग पुन्हा तिकिटासाठी रांगा लावल्या. अनेकांनी चेंबूर मोनोरेल स्थानकाखाली असलेल्या चहाच्या टपरीवर चहा आणि गरमागरम वडय़ाचा आनंद घेतला आणि पुन्हा मोनोरेलमध्ये गेले. हे कूपन कसे लावायचे, सोबत न्यायचे का, कुठून बाहेर पडायचे, परतीचे तिकीट नाही का? असे प्रश्ना प्रवासी विचारत होते. सुरक्षेसाठी गणवेषातले कर्मचारी जागोजागी तैनात होते.
फेऱ्या वाढवल्या
प्रवाशांचा प्रतिसाद पाहून रविवारी पहिल्याच दिवशी मोनोरेलच्या फेऱ्या वाढवण्याची वेळ मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर आली. ठरल्याप्रमाणे दुपारी तीन वाजता मोनोची फेरी थांबणार होती. मात्र, गर्दी पाहता दुपारी साडेचार वाजेपर्यंत मोनोची सेवा सुरू ठेवावी लागली. यादरम्यान मोनोच्या ६१ फेऱ्या झाल्या. वडाळा ते चेंबूर हे अंतर कापायला मोनोला १९ मिनिटांचा अवधी लागतो. पण रविवारी मुंबईकरांनी प्रचंड गर्दी केली. त्यामुळे अडीच वाजता मोनोच्या स्थानकातील प्रवेश बंद करण्यात आला. त्याआधी आत गेलेल्या सर्वाना तिकिटे देण्यात आली. या सर्वाना मोनोचा प्रवास करत यावा यासाठी फेऱ्या वाढवण्यात आल्या. त्यामुळे दुपारी तीनऐवजी साडेचापर्यंत मोनोरेल मुंबईकरांसाठी धावत होती. पहिल्या दिवशी वीस हजारांपेक्षा अधिक मुंबईकरांनी मोनोचा प्रवास केल्याची माहिती ‘एमएमआरडीए’चे सहप्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी दिली. १९ हजार ६७८ तिकिटे विकली गेल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे प्रवाशांची नेमकी संख्या उपलब्ध झाली नाही. मोनोरेलचे सारथ्य कॅप्टन सुमनकुमार यादव आणि कॅप्टन ज्युली भंडारे यांनी केले.
..आणि गर्दी वाढत गेली
सकाळी पहिल्या फेरीपासून लोकांची जी गर्दी होती ती नंतर नंतर वाढत गेली. रांगा पार रस्त्यावर लांबच लांब गेल्या. व्हॉटस अ‍ॅप आणि फेसबुकवरही मोनोच्या पहिल्या प्रवासाचा आनंद तातडीने ‘शेअर’ केला जात होता.  लहान मुलांनाही या आगळ्या वेगळ्या गाडीचे कौतुक वाटत होते.
प्रवाशांच्या प्रतिक्रिया
उत्तम पर्याय मिळाला
पहिल्या मोनोरेलमध्ये प्रवास करण्याचा ऐतिहासिक अनुभव मिळाल्याचा आनंद अहे. आम्हाला आता प्रतीक्षा नगरहून चेंबूरला जाण्याचा उत्तम पर्याय मिळाला आहे.
साधना राऊत,

प्रतीक्षा नगर, शीव भक्ती पार्कला पूल हवा
आम्ही भक्ती पार्क मध्ये राहतो. तेथून मोनोचे भक्ती पार्क स्थानक खूप लांब आहे. आत येण्यासाठी एखाद्या स्कायवॉकसारख्या पुलाचा पर्याय हवा. अन्यथा मोनोसाठी पाच रुपयांचे तिकिट आणि भक्ती पार्कमध्ये पोहोचायला तीस रुपयांची टॅक्सी करावी लागेल.
सुनंदा वाघ,  भक्ती पार्क

वातानुकूलित प्रवास
मी आता एकटाच आलोय. नंतर कुटुंबियांना घेऊन येईल. आम्ही आतापर्यंत लोकलने प्रवास केला. पण, या वातानुकूलित मोनोचा प्रवास करणे खूप आनंददायी अनुभव होता. या राइडमुळे खूप आनंद झाला.
सुरेश वैराळ, ज्येष्ठ नागरिक, चेंबूर

हा आनंद अवर्णनीयच
मला पहिल्या मोनोरलमधून प्रवास करायचा होता. पण मी कांदिवलीमध्ये राहते. एवढय़ा सकाळी येणे शक्य नव्हते. त्यामुळे आदल्या रात्रीच प्रतीक्षानगरमधील मैत्रिणीच्या घरी येऊन मुक्काम केला होता. सकाळपासूनच रांग लावली होती. फन राइडचा आनंद अवर्णनीयच
अंजना झेंडे