मुंबई : मुंबईचे महत्त्वाचे प्रवेशद्वार असलेल्या वाशी नाका, तसेच ऐरोली नाका या दोन्ही परिसरात पर्यावरणपूरक आणि आकर्षक असा हरितक्षेत्र विकास करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्याचे आदेश महापौर रितू तावडे यांनी नुकतेच प्रशासनाला दिले. महामार्गाच्या दुतर्फा हरित क्षेत्र विकसित करून अनावश्यक झुडपे काढून नियोजनबद्ध पद्धतीने वृक्षारोपण करावे, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, पूर्व द्रुतगती महामार्गाच्या खाडीकिनारी असलेल्या पंतनगर – मुलुंड मार्गावरील ‘एन’, ‘एस’ आणि ‘टी’ या तीनही विभागांच्या हद्दीत पिवळ्या बहाव्याची लागवड करण्याचा विशेष उपक्रम हाती घ्यावा, अशी सूचना तावडे यांनी केली.
रितू तावडे यांनी सोमवारी वाशी नाका आणि ऐरोली नाका येथे हरितक्षेत्र विकासासंदर्भात पाहणी केली. त्यावेळी त्यांनी विविध सूचना केल्या. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त म्हणजेच ५ जून २०२६ रोजी या हरितक्षेत्र विकासाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे मुंबईच्या प्रवेशद्वारांना सौंदर्य प्राप्त होण्याबरोबरच पर्यावरण संरक्षण, जैवविविधता संवर्धन आणि स्वच्छ व निरोगी वातावरण निर्मितीस हातभार लागेल, असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला. मुंबईत प्रवेश करताना वाशी नाका आणि ऐरोली नाका या दोन्ही ठिकाणांहून दररोज हजारो वाहनांची आणि नागरिकांची वर्दळ होत असते. त्यामुळे या परिसरांचे सुशोभीकरण आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून हरितक्षेत्र विकास करणे अत्यंत आवश्यक आहे.
या दोन्ही ठिकाणी महामार्गाच्या दुतर्फा नियोजनबद्ध हरित क्षेत्र विकसित करून महामार्गांना अधिक सुंदर आणि पर्यावरणस्नेही स्वरूप प्रदान करता येईल. या उपक्रमामुळे परिसरातील धूळ नियंत्रणास मदत होईल, वाहनांमधून होणाऱ्या प्रदूषणाचा परिणाम कमी करण्यास हातभार लागेल तसेच हवेची गुणवत्ता सुधारण्यासही मदत होईल. या प्रकल्पाअंतर्गत महामार्गालगत वाढलेली झुडपे, तण आणि अनावश्यक वनस्पती काढून त्या ठिकाणी सुयोग्य पद्धतीने हरित पट्ट्यांची निर्मिती करण्यात यावी. वृक्षारोपणासाठी आकर्षक फुलझाडांना प्राधान्य देत पिंक टेब्यूबिया आणि पिवळा बहावा यांसारख्या वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड करावी. या वृक्षांमुळे परिसराचे सौंदर्य खुलून येईल, तर घनदाट हिरवाईमुळे पर्यावरणीय समतोल राखण्यास मदत होईल. या हरित पट्ट्यांमध्ये स्थानिक जैवविविधतेला पूरक ठरणाऱ्या वनस्पतींचाही समावेश करता येईल, असे महापौरांनी नमूद केले.
पिवळ्या बहव्याची विशेष लागवड
ऐरोली नाका येथे पाहणी करताना तावडे म्हणाल्या की, पंतनगर – मुलुंडदरम्यान पूर्व द्रुतगती महामार्गालगत खाडीच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागांवर ‘एन’, ‘एस’ आणि ‘टी’ या तिन्ही प्रशासकीय विभागांच्या माध्यमातून पिवळ्या बहाव्याची विशेष लागवड करावी. खाडीकिनारी निर्माण होणारा हा पट्टा पर्यावरण संवर्धनाबरोबरच मुंबईच्या सौंदर्यात भर घालणारा ठरेल. या उपक्रमामुळे हरित आच्छादन वाढेल, कार्बन शोषणास चालना मिळेल, पक्षी व इतर जीवांसाठी अनुकूल अधिवास निर्माण होईल आणि नागरिकांना अधिक स्वच्छ व निरोगी वातावरण लाभेल. मुंबईच्या प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण, पर्यावरण संरक्षण आणि हरित मुंबईच्या संकल्पनेला बळकटी देणारा हा उपक्रम भविष्यात मुंबईसाठी एक आदर्श, तसेच फायदेशीर ठरू शकतो. मुंबईच्या हरित विकासाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे, असेहीतावडे यांनी नमूद केले.
त्यावेळी ‘एम पूर्व’ विभागाच्या प्रभाग समिती अध्यक्ष खैरनुसा अकबर हुसेन, ‘परिमंडळ ५’च्या उपायुक्त संध्या नांदेडकर, ‘परिमंडळ ६’चे उपायुक्त संतोषकुमार धोंडे, विभागीय वन अधिकारी (कांदळवन कक्ष) दीपक खाडे, टी विभागाच्या सहायक आयुक्त योगिता कोल्हे, एम पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता तथा सहायक आयुक्त भास्कर कसगीकर, वन परिक्षेत्र अधिकारी प्रशांत बहादुरे, उप उद्यान अधीक्षक सुनील राठोड, महानगरपालिकेच्या पूल विभागाचे कार्यकारी अभियंता नामदेव रावकाळे आदी अधिकारी उपस्थित होते.
