मुंबई : पारशी खाद्यसंस्कृतीसाठी ओळखले जाणारे मुंबईतील फोर्टच्या हॉर्निमन सर्कल परिसरातील प्रसिद्ध व शंभर वर्ष जुने ‘जिमी बॉय कॅफे’ काही काळासाठी बंद ठेवण्यात आले आहे. हा कॅफे विकास इमारतीच्या तळमजल्यावर आहे, मात्र सदर इमारत धोकादायक बनल्याचे मुंबई महानगरपालिकेने घोषित केल्यानंतर ‘जिमी बॉय कॅफे’ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
येत्या सप्टेंबर २०२५ मध्ये ‘जिमी बॉय कॅफे’ला १०० वर्षे पूर्ण होत आहेत, मात्र इमारत धोकादायक झाल्यानंतर शतकपूर्तीपूर्वीच कॅफे काही काळासाठी बंद ठेवण्याची वेळ आली आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने फोर्टमधील हॉर्निमन सर्कल परिसरातील विकास इमारतीची पाहणी केली होती. या इमारतीला विविध ठिकाणी तडे गेल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले होते. संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत आपत्ती व्यवस्थापन कक्षाला माहिती दिली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कक्षाने इमारतीची पाहणी केली आणि सुरक्षेच्या कारणास्तव इमारत रिकामी करण्याच्या सूचना दिल्या.
त्यामुळे ‘जिमी बॉय कॅफे’ बंद ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला. परंतु ‘जिमी बॉय कॅफे’ची सेवा माहीम येथे सुरू आहे. तसेच कुलाबा – अंधेरीदरम्यान ऑनलाईन सेवाही सुरू आहे. सध्या फोर्टमधील विकास इमारतीच्या देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असून हे काम पूर्ण झाल्यानंतर त्याच ठिकाणी ‘जिमी बॉय कॅफे’ पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे समजते.
‘कॅफे इंडिया’ या नावाने शंभर वर्षांपूर्वी म्हणजेच सप्टेंबर १९२५ मध्ये सुरू झालेला हा कॅफे अल्पावधीतच लोकप्रिय झाला आणि त्याने मुंबईतील प्रसिद्ध कॅफेंच्या यादीत विशेष स्थान मिळवले. एका कुटुंबातील तीन पिढ्या चालवत असलेल्या ‘कॅफे इंडिया’च्या नावात १९९९ मध्ये बदल करण्यात आला आणि कॅफेचे नाव बदलून ‘जिमी बॉय कॅफे’ ठेवण्यात आले. याचदरम्यान खाद्यपदार्थांच्या यादीत नवनवीन पारशी पदार्थांचीही भर पाडली.
खिमा पाव, ब्रुन मस्का, इराणी चहा, ऑम्लेट पाव, मावा केक, मावा समोसा या पदार्थांसाठी हा कॅफे प्रसिद्ध आहे. तसेच पारशी खाद्यसंस्कृतीची ओळख असलेले धनसाक, पात्रा नी मच्छी, सॉस नी मच्छी, चिकन बेरी पुलाव, सल्ली बोटी, धुन डाळ आणि प्रॉन्स पॅटियो अशा नानाविध पदार्थांची मेजवानी एकाच ठिकाणी म्हणजेच ‘जिमी बॉय कॅफे’मध्ये असल्यामुळे या ठिकाणी खवय्यांची कायम गर्दी व्हायची.