मुंबई : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईतील अन्न आस्थापनांविरोधात तपासणी मोहीम तीव्र केली असून, गंभीर स्वच्छता व अन्न सुरक्षा त्रुटी आढळलेल्या पाच आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे. एकवीरा झुणका भाकर केंद्र, मनीषा स्वीट्स, नवाब सीख कॉर्नर आणि हॉटेल अश्विन यांचे अन्न परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले असून, कांजूरमार्ग येथील श्री गजानन वडापाव स्नॅक्स सेंटरमध्येही गंभीर त्रुटी आढळल्याने कारवाई करण्यात आली.
कांजूरमार्ग पश्चिम येथील श्री गजानन वडापाव, स्नॅक्स सेंटरची ८ सप्टेंबर रोजी तपासणी करण्यात आली. येथे अन्न तयार करण्याची जागा खुली असून स्वयंपाकघराला दरवाजा नसणे, कीटकांचा प्रवेश रोखण्यासाठी अपुरी व्यवस्था, अन्नपदार्थांसाठी अयोग्य साहित्याची उपकरणे, अस्वच्छ फरशी, नाल्यांमध्ये अन्नकचरा व सांडपाणी साचणे, तसेच उंदराच्या विष्ठेच्या खुणा आढळल्या. तयार अन्नपदार्थ झाकण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर केला जात असल्याचेही निदर्शनास आले. तपासणीदरम्यान एक कर्मचारी अन्नपदार्थ तयार करताना तंबाखू चघळताना आढळले तर येथे खराब झालेले कांदीही आढळले.
जोगेश्वरी, मुलुंड, कुर्ल्यात धडक कारवाई
- जोगेश्वरी पूर्व येथील समर्थ स्वीट्सची ८ सप्टेंबर रोजी केलेल्या तपासणीत उत्पादन परिसरात उघडी गटारे व कचरा, अस्वच्छ भिंती व छत, अपुरी प्रकाश व वायुविजन व्यवस्था आणि सांडपाणी साचल्याचे आढळले. उत्पादन परिसरात कपडे व वैयक्तिक वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. कच्चे आणि तयार अन्नपदार्थांचे योग्य विलगीकरण नसल्याचे, पॅकेजिंग साहित्य जमिनीवर उघड्यावर ठेवल्याचे तसेच उत्पादन परिसरात मोठ्या प्रमाणात उंदरांचा वावर आढळल्याचे तपासणी अहवालात नमूद आहे.
- मुलुंड पूर्व येथील एकवीरा झुणका भाकर केंद्राची ९ सप्टेंबर रोजी केलेल्या तपासणीत आस्थापनेची जागा अरुंद व दाटीवाटीची असून पुरेशी वायुविजन व्यवस्था नसल्याचे आढळले. मनीषा स्वीट्सच्या तपासणीत उत्पादन विभाग मागील बाजूस उघड्या व अस्वच्छ जागेत सुरू असल्याचे आढळले. अन्न, पॅकेजिंग साहित्य, रसायने आणि वैयक्तिक वस्तूंसाठी स्वतंत्र साठवणूक व्यवस्था नव्हती. उत्पादन परिसरातील उपकरणे अस्वच्छ व काळवंडलेल्या स्थितीत होती. फरशीवर तेलाचा थर, भिंती व छताला तडे, तेल-काजळी तसेच कीटक प्रतिबंधक जाळ्यांचा अभाव आढळल्याचे अहवालात नमूद आहे.
- कुर्ला पश्चिम येथील नवाब सीख कॉर्नरच्या तपासणीत साठविलेल्या रव्यामध्ये मुंग्या, उघड्यावर ठेवलेले कच्चे मांस, तसेच कच्चे, शिजविलेल्या पदार्थांची योग्य विभक्त साठवणूक नसल्याचे आढळले. कुर्ल्यातील हॉटेल अश्विनमध्ये अन्न साठवणूक, तापमान नियंत्रण, स्वच्छता, वायुविजन अशा गंभीर त्रुटी आढळल्या. कच्चे व शिजविलेले तसेच शाकाहारी व मांसाहारी अन्नपदार्थांची योग्य विभक्त साठवणूक करण्यात आली नव्हती.
