मुंबई : अन्न सुरक्षा व स्वच्छता नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने मुंबईतील चार हॉटेलांविरोधात कारवाई केली आहे. गोरेगाव येथील ईटक्लब ब्रँड्स प्रायव्हेट लिमिटेड आणि कुर्ला येथील राणी क्रिएटर्स कन्सल्टंट अँड सर्व्हिस प्रोव्हायडर्स यांचे अन्न परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. चेंबूर येथील गुडलक बेकरी अँड स्टोअर्स आणि अशफाक बेकरी यांच्याविरुद्ध परवाना निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
रॉयल पाम्स, आरे मिल्क कॉलनी, गोरेगाव पूर्व येथील ईट क्लब ब्रँड्स प्रायव्हेट लिमिटेडची तपासणी केल्यानंतर एफडीएने गंभीर त्रुटींची नोंद केली. अन्न पदार्थ, पॅकेजिंग साहित्य, रसायने आणि कर्मचाऱ्यांच्या वस्तूंसाठी आवश्यक व योग्य साठवणूक व्यवस्था नसल्याचे आढळले. कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छता व हात धुण्याच्या सुविधा अपुऱ्या असल्याचेही निदर्शनास आले. तसेच परवान्यामध्ये नमूद केलेल्या उत्पादनांव्यतिरिक्त आईस्क्रीम आणि कार्बोनेटेड पेये विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे तपासणीत निदर्शनास आले. त्यामुळे त्यांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
जरीमरी, कुर्ला पश्चिम येथील राणी क्रिएटर्स कन्सल्टंट अँड सर्व्हिस प्रोव्हायडर्स या आस्थापनेच्या तपासणी दरम्यान उंदीर आणि अळ्यांचा प्रादुर्भाव आढळला. स्वयंपाक करण्याच्या आणि साठवणुकीच्या ठिकाणी अस्वच्छता, घाण, तेलकटपणा, खरकटे आणि साचलेले पाणी आढळले. अन्न कचरा व इतर टाकाऊ पदार्थांची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याचे निदर्शनास आले. काही ठिकाणी पोत्यावर वर्तमानपत्राचा वापर करून अन्न झाकण्यात आले होते. अन्नाच्या संपर्कात येणाऱ्या पॅकेजिंग साहित्याबाबत आवश्यक अनुरूपता प्रमाणपत्रही उपलब्ध करून देण्यात आले नव्हते. या गंभीर त्रुटींच्या पार्श्वभूमीवर परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे.
चेंबूरमधील अश्फाक बेकरी आणि गुडलक बेकरी अँड स्टोअर्सच्या तपासणीत अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या निकषांचे पालन होत नसल्याचे आढळल्याने परवाना निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
