मुंबई : अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक मोहीम हाती घेतली. त्याअंतर्गत मुंबईतील आदित्य बिर्ला समूहाशी संबंधित एका नामांकित रेस्टॉरंटसह सहा रेस्टॉरंट, हॉटेल, बेकरी आणि क्लबच्या अन्न सुरक्षा परवान्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राज्याचे एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, आदित्य बिर्ला न्यू एज रेस्टॉरंट्स अँड कॅफे प्रायव्हेट लिमिटेडतर्फे चालविण्यात येत असलेला रेस्टॉरंटवर कारवाई नरिमन पॉइंट येथे ‘फ्लिंट अँड वार्सा’ या रेस्टॉरंटची २७ जून रोजी तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान अन्नपदार्थांच्या चुकीच्या ब्रँडिंगचे प्रकार आढळून आले. त्यामुळे पाच अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले असून ११ हजार ३५० रुपयांचा चुकीच्या ब्रँडिंगचा साठा जप्त करण्यात आला. याशिवाय, १६ हजार २०१ रुपयांचे मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळून आले. हा साठा तात्काळ नष्ट करण्यात आला. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याने संबंधित आस्थापनेच्या परवान्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
अन्य पाच आस्थापनांवरही कारवाई बोरीवली येथील एम. के. बेकरीमध्ये नूतनीकरणाचे काम सुरू असतानाच अन्न उत्पादन सुरू असल्याचे आणि मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळल्याने कारवाई करण्यात आली. तसेच योग्य लेबल नसलेला साठा जप्त करण्यात आला. भांडुप येथील हॉटेल श्रीकृष्णा (सुजित बार अँड रेस्टॉरंट) येथे रेफ्रिजरेटरची स्थिती निकृष्ट असल्याचे, तापमान नियंत्रणाची नोंद नसल्याचे आणि स्वच्छतेच्या अनेक त्रुटी आढळून आल्या.
सांताक्रूझ पूर्व येथील हॉटेल गोपालकृष्णामध्ये स्वयंपाकगृहात उंदीर फिरताना दिसला, ड्रेनेजमध्ये कचरा साचलेला आढळला आणि परिसरात दुर्गंधी पसरलेली असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. अंधेरी येथील कराक एंटरप्रायझेस प्रा. लि. मध्ये झुरळांचा प्रादुर्भाव, कामगारांच्या वैद्यकीय तपासणीचा अभाव, तक्रार निवारण यंत्रणेतील त्रुटी आणि खराब रेफ्रिजरेशन व्यवस्था आढळून आली.
वांद्रे येथील ‘मद्रास डायरीज’ येथे स्वच्छतेबाबत नियमांचे पालन न झाल्याचे आणि आवश्यक अन्न सुरक्षा नोंदी उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. तक्रारी करण्याचे आवाहन अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास नागरिकांनी त्वरित तक्रार नोंदवावी, असे आवाहन एफडीएने केले आहे. यासाठी टोल-फ्री क्रमांक १८००२२२३६५ उपलब्ध करून देण्यात आला आहे.
सार्वजनिक आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा आस्थापनेला पाठीशी घातले जाणार नाही. अशा प्रकरणांमध्ये कठोर कायदेशीर कारवाई सुरूच राहील. – तुकाराम मुंढे, आयुक्त, एफडीए
