मुंबई : अन्नपदार्थ पॅकिंग करण्यासाठी अथवा थेट संपर्कात येईल अशा प्रकारे वर्तमानपत्राचा वापर करणे हे ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. त्यामुळे अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) वर्तमानपत्राच्या वापरास मनाई असल्याबाबतच्या सूचना यापूर्वी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एफडीएने ५ ते १६ जून या कालावधीत मुंबईमध्ये विशेष तपासणी मोहीम राबवली.

वृत्तपत्राच्या छपाईसाठी वापरण्यात येणाऱ्या शाईमध्ये अनेक हानिकारक रंग, रसायने, शिसे आणि इतर जड धातूंचा समावेश असतो. अन्नपदार्थ गरम असताना किंवा तेलकट पदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळल्यास शाईतील रासायनिक घटक अन्नामध्ये मिसळून आरोग्यास अपायकारक ठरू शकतात. त्यामुळे आरोग्याच्या गंभीर आणि दीर्घकालीन समस्या उद्भवू शकतात. वृत्तपत्रांचे वितरण आणि हाताळणीमुळे ती आजार निर्माण करणाऱ्या रोगजंतूंचे वाहक होण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्व अन्न व्यावसायिकांनी वर्तमानपत्राचा वापर तात्काळ बंद करून अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासनाने दिल्या होत्या.

अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार मुंबई विभागातर्फे ५ ते १६ जून या कालावधीत अन्न व्यवसाय आस्थापनांची तपासणी मोहीम हाती घेतली. या मोहीमेत ५५ अन्न व्यवसाय आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान २६ आस्थापनांमध्ये अन्नपदार्थ पॅकिंग किंवा विक्रीसाठी वर्तमानपत्राचा वापर होत असल्याचे आढळून आले. त्यापैकी १७ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. संबंधित सर्व प्रकरणांमध्ये अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली. या कारवाईअंतर्गत अन्न व्यावसायिकांकडून १ लाख ५१ हजार रुपये इतका तडजोड दंड वसूल करण्यात आला. उर्वरित प्रकरणांमध्ये पुढील कार्यवाही सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि सह आयुक्त (अन्न) महेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार मुंबई विभागातील अन्न सुरक्षा अधिकारी यांनी ही कारवाई केली.

अन्नपदार्थ गरम असताना किंवा तेलकट पदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळल्यास शाईतील रासायनिक घटक अन्नामध्ये मिसळून आरोग्यास अपायकारक ठरू शकतात. त्यामुळे सर्व अन्न व्यावसायिकांनी वर्तमानपत्राचा वापर तात्काळ बंद करून अन्न सुरक्षा नियमांचे पालन करावे. तसेच अन्न व औषध प्रशासनामार्फत अशा प्रकारच्या तपासणी मोहिमा नियमितपणे राबविण्यात येणार आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.