मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) १ एप्रिलपासून राज्यातील गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधी सुपारी, खर्रा, मावा अशा प्रतिबंधित उत्पादनांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. मागील १ ते १३ एप्रिल या १३ दिवसांच्या कालावधीत मुंबईतील १५ ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये तब्बल १३ लाख रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल करण्यात आले असून, १६ जणांना अटक करण्यात आली.
मालाड, कुर्ला, धारावी, नळबाजारात कारवाई
मुंबईच्या विविध विभागांमध्ये गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधी सुपारी, खर्रा, मावा अशा प्रतिबंधित उत्पानांची विक्री होत असल्याची माहिती एफडीएच्या मुंबई कार्यालयाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे १ ते १३ एप्रिल या कालावधीत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी मुंबईमध्ये धडक कारवाई केली. या कारवाईत मुंबईतील मालाड, कुर्ला, सांताकुझ, भांडुप, धारावी, मुलुंड, नळबाजार, बोरिवली आदी १५ ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा आढळला. १५ ठिकाणी केलेल्या या कारवाईमध्ये १३ लाख ६९ हजार २९३ रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. या कारवायांसदर्भात संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये नऊ गुन्हे दाखल करण्यात आले असून, १६ व्यक्तींना अटक करण्यात आली. सदर कारवाई आयुक्त श्रीधर डुबे पाटील व सह आयुक्त (अन्न) महेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार करण्यात आली.
एफडीएचे नागरिकांना आवाहन
कोणत्याही कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जनतेचा सक्रिय सहभाग आवश्यक व गरजेचा असल्याने प्रतिबंधित अन्नपदार्थाचे उत्पादन, साठवणूक, वितरण, वाहतूक किंवा विक्री होत असल्यास त्याबाबत सविस्तर माहिती प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००-२२२-३६५ वर नोंदवावी. प्रतिबंधित अन्नपदार्थाचे मानवी शरीरावर होणारे अत्यंत घातक परिणाम किंवा दुष्परिणाम विचारात घेता अन्नपदार्थाचे सेवन न करण्याबाबत, तसेच या अन्नपदार्थाच्या सेवनाच्या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन सह आयुक्त (अन्न) महेश चौधरी यांनी नागरिकांना केले.
काय आहे कायदा
१६ जुलै २०२५ च्या आदेशान्वये स्वादिष्ट, सुगंधित किंवा कोणत्याही मिश्रकासोबत मिसळलेला तंबाखू आणि सुपारी, तसेच गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधी सुपारी, मिश्रकेयुक्त उत्पादित चघळण्याचा तंबाखू, खर्रा, मावा यावर महाराष्ट्रात संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. जनतेच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन ही बंदी घालण्यात आली आहे. स्वादिष्ट, सुगंधित किंवा कोणत्याही मिश्रकासोबत मिसळलेला तंबाखू आणि सुपारी, तसेच गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधी सुपारी, मिश्रकेयुक्त उत्पादित चघळण्याचा तंबाखू, खर्रा, मावा याची निर्मिती, साठवण, वितरण, वाहतूक किंवा विक्रीला राज्यात बंदी आहे.
