मुंबई : खाद्यतेलामध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने राबविलेल्या विशेष मोहीमेंतर्गत ऑक्टोबरमध्ये घाऊक तसेच किरकोळ विक्रेत्यांच्या १ हजार ८९ तपासण्या करण्यात आल्या. विश्लेषणासाठी १ हजार ६६० नमुने घेण्यात आले असून, तब्बल २८ हजार ७५३ क्विंटलहून अधिक खाद्यतेलाचा साठा जप्त केला. या साठ्याची किंमत सुमारे १८ कोटी ९५ लाख रुपये आहे. या कारवाईत ८० अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार जप्त केलेल्या खाद्यतेलाचे एकूण वजन २८,७५३.०७ क्विंटल असून त्याची किंमत १,८९४.७६ लाख रुपये आहे. पुणे विभागात सर्वाधिक १९,५५२ क्विंटल खाद्यतेल जप्त केले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागात ५,७३६.२७ क्विंटल तेलसाठा, कोकण विभागात २,१४६.०६ क्विंटल, बृहन्मुंबई विभागात ५०६.७० क्विंटल, नाशिक विभागात ३८८.७ क्विंटल, नागपूर विभागात २५५.९६ क्विंटल आणि अमरावती विभागात १६७.६१ क्विंटल खाद्यतेल जप्त करण्यात आले. या कारवाईमध्ये ८० अन्न व्यवसाय परवाने निलंबित केले असून, यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्वाधिक २७ परवान्यांचा समावेश आहे. पुणे विभागातील २२, बृहन्मुंबईतील आठ, कोकणमधील सहा, नाशिकमधील सहा, नागपूरमधील सहा आणि अमरावती विभागातील पाच परवाने निलंबित करण्यात आले आहेत. एफडीएने घेतलेल्या नमुन्यांपैकी ४६२ नमुने प्रमाणित आढळले आहेत. तर ४० नमुने अप्रमाणित, १८ नमुने असुरक्षित आणि पाच नमुने मिथ्याछाप असल्याचे निष्पन्न झाले आहे. अद्याप १ हजार १७१ नमुन्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. अप्रमाणित, असुरक्षित अथवा मिथ्याछाप नमुने आढळलेल्या प्रकरणांमध्ये संबंधितांविरुद्ध न्यायालयीन खटले किंवा न्यायनिर्णयाची प्रकरणे दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
निलंबनाची प्रमुख कारणे
पुनर्वापर केलेल्या डब्यांमधून अथवा विनालेबल कंटेनरमधून खाद्यतेलाची विक्री करणे, खाद्यतेल कमी दर्जाचे किंवा भेसळयुक्त असल्याचा संशय, आस्थापनांमध्ये स्वतःची प्रयोगशाळा अथवा तांत्रिक व्यक्ती उपलब्ध नसणे, अस्वच्छ वातावरणात उत्पादन व साठवणूक करणे आणि लेबलविषयक नियमांचे उल्लंघन करणे ही परवाने निलंबित करण्यामागील प्रमुख कारणे आहेत.
मुंबईतील आठ आस्थापनांवर कारवाई
बृहन्मुंबई विभागात आठ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. त्यामध्ये कुर्ल्यातील अंकट ऑइल्स, भायखळा ऑइल डेपो, नागपाडा येथील राज ऑइल ट्रेडिंग, गोरेगावमधील आशापुरा ट्रेडर्स, घाटकोपरमधील दीपा वुड प्रेस्ड ऑइल, मालाडमधील मोमाई ऑइल अँड ग्रेन डेपो आणि कांदिवलीतील अजंता ऑइल ट्रेडिंग कंपनीचा समावेश आहे. या आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
