मुंबई : राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने गेल्या वर्षी जानेवारीत आयोजित केलेला आठ दिवसांचा ‘मुंबई फेस्टिव्हल’ यंदा गुंडाळण्यात आला आहे. तिजोरीवर पडणाऱ्या अतिरिक्त खर्चाला कात्री लावण्याच्या फडणवीस सरकारच्या धोरणाचा हा भाग असल्याचे सांगण्यात येते. गतवर्षी या सोहळ्यासाठी राज्य शासनाने २९ कोटींपर्यंत खर्च मंजूर केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईच्या ‘सांस्कृतिक भव्यतेची झलक’ जगाला दाखवण्यासाठी तत्कालीन पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने २० ते २८ जानेवारी २०२४ या काळात शहरातील ५० ठिकाणी ‘मुंबई फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले होते. उद्योगपती आनंद महिंद्रा यांना सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी नेमून ‘विझक्रॉप्ट एंटरटेनमेंट’ या खासगी कंपनीवर आयोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. अनेक वित्तसंस्था, नामांकित कंपन्यांनी महोत्सवाला भरभरून मदत केली. ‘मुंबई एक त्यौहार है’ या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राची संस्कृती, संगीत, चित्रपट, खाद्या, बीच सेलिब्रेशन आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन ५० पेक्षा जास्त ठिकाणी करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मुंबईकरांनी महोत्सवाकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते.

हेही वाचा >>> टोरेसच्या कांदिवलीतील कार्यालयावर छापे

केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणारे पर्यटन प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथिगृहावर झालेल्या पर्यटन विभागाच्या आढावा बैठकीत सोमवारी दिले. गेल्या वर्षी तयार करण्यात आलेल्या पर्यटन धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. पर्यटन विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या सादरीकरणात ‘मुंबई फेस्टिव्हल’चा उल्लेख टाळण्यात आला आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या या महोत्सवाला यंदा कात्री लावण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

यंदा काळा घोडाचा जल्लोष

●गेल्या २५ वर्षांपासून साजरा होणारा ‘काळा घोडा महोत्सव’ गतवर्षी मुंबई फेस्टिव्हलमध्येच सामावून घेण्यात आला होता. त्यामुळे काळा घोडा महोत्सवाचा चाहता वर्ग नाराज झाला व त्यांनी पाठ फिरविली.

●यंदा मुंबई फेस्टिव्हल होणार नसला तरी २५ जानेवारी ते २ फेब्रुवारी या काळात ‘काळा घोडा’ची रंगत मुंबईकरांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे.

गतवर्षी ‘मुंबई फेस्टिव्हल’ची तयारी जुलैपासून करण्यात आली होती. मात्र लोकसभा व विधानसभा निवडणुकांमुळे या फेस्टिव्हलची तयारी करण्याचा प्रश्नच नव्हता. राज्य शासनाच्या धोरणानुसार पुढील वर्षी महोत्सवाविषयी निर्णय घेतला जाईल. -डॉ. बी. एन. पाटील, पर्यटन संचालक

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai festival organized tourism department of maharashtra government cancelled this year zws