मुंबई : मुंबईत टोलेजंग इमारतींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आगीच्या घटनांमध्येही सातत्याने वाढ होत आहे. बहुमजली इमारतीला लागलेली आग विझवताना अग्निशमन दलाला विविध आव्हानांचा सामना करावा लागतो. असे असूनही अग्निशमन दलाच्या ताफ्यात अद्यापही १०४ मीटर उंचीच्या शिडीचे (टर्नटेबल लॅडर) वाहन दाखल झालेले नाही. या शिदीचा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीच्या प्रक्रियेत अडकल्याने उंच इमारतींच्या अग्नीसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, गेल्या तीन वर्षांत सुमारे १५ हजार आगीच्या घटना घडल्याने अग्निसुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करणे अत्यावश्यक झाले आहे.

मुंबईत गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात विकासकामांवर भर दिला जात असून सद्यस्थितीत गगनचुंबी इमारतीची अनेक कामे सुरू आहेत. या इमारतींमध्ये आग लागल्यास अग्निशमन दलाच्या जवानांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच, वेळेत मदतकार्य न पोहोचल्यास जीवितहानी होण्याचीही दाट शक्यता असते. सद्यस्थितीत अग्निशमन दलाकडे ६४ मीटर उंचीच्या दोन, ५५ मीटर उंचीची एक, ३७ मीटर उंचीच्या तीन, ३२ मीटर उंचीची एक आणि ३० मीटर उंचीची एक अशी एकूण आठ उंच शिडी असलेली वाहने (टर्न टेबल लॅडर) आहेत. आता लवकरच हायड्रॉलिक लॅडर प्लॅटफॉर्म वाहनांच्या ताफ्यात १०४ मीटर उंचीच्या चार वाहनांची भर पडणार आहे. अग्निशमन दलाने याबाबतचा प्रस्ताव तयार केला असून तो प्रशासकीय मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. सद्यस्थितीत अग्निशमन दलाकडे सहा हायड्रॉलिक लॅडर प्लॅटफॉर्मची वाहने आहेत. मात्र, प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे अद्याप वाहन प्रशासकीय मंजुरीच्या प्रक्रियेत अडकले आहे.

दरम्यान, मुंबईत दरवर्षी सुमारे पाच हजार आगीच्या घटना घडतात. अनेक घटना किरकोळ, तर काही घटना भीषण असतात. गेल्या तीन वर्षांत मुंबईत सुमारे १५ हजार आगीच्या घटना घडल्या असून त्यात अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. मुंबई अग्निशमन दलातर्फे दरवर्षी शहारातील इमारतींमधील अग्निशमन यंत्रणेची तपासणी केली जाते. मंगळवारी रात्री विलेपार्ले येथील एका बहुमजली इमारतीत भीषण आग लागून अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह घरकाम करणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला. चौकशीअंती इमारतीतील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे समोर आले. त्यामुळे अग्निशमन दलातर्फे करण्यात आलेल्या तपासणीबाबत शंका निर्माण होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अग्निशमन दलातर्फे अग्निसुरक्षेच्या दृष्टीने इमारतींची तपासणी करण्यात आली होती. मात्र, त्या तपासणीत काय निष्पन्न झाले, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, मुंबईत गेल्या तीन वर्षात म्हणजेच २०२३ ते २०२५ या कालावधीत एकूण १५ हजार ७३४ आगीच्या घटना घडल्या. त्यात अनेकजण जखमी, तर काहींचा मृत्यू झाला. २०२३ मध्ये ५ हजार ७४, २०२४ मध्ये ५ हजार ३५९, तर २०२५ मध्ये ५ हजार ३५९ आगीच्या दुर्घटना घडल्या.

उंच शिड्यांपेक्षा इमारतीतील अग्निसुरक्षा यंत्रणांच प्रभावी

अनेक लहान – सहान व आवश्यक बाबींचा विचार करून प्रशासकीय मंजुरी दिली जाते. प्राथमिक मान्यता मिळाल्यानंतर १०४ मीटर उंचीच्या हायड्रॉलिक लॅडर प्लॅटफॉर्मबाबतची पुढील प्रक्रिया सुरू होईल. तसेच, सद्यस्थितीत ताफ्यात सर्वाधिक म्हणजेच ९० मीटर उंच शिडीचे वाहन आहे. ते २७-२८ मजल्यापर्यंत पोहोचू शकते. मात्र, प्रचंड उंच इमारती असल्यास त्या तुलनेत तेवढीच उंच शिडी असलेले वाहन वापरणे शक्य नाही. त्यासाठी इमारतीतील अग्नीसुरक्षा यंत्रणाच प्रभावी असणे गरजेचे असल्याचे अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

अग्निशमन दलाच्या ताफ्यातील वाहने

एरियल लॅडर प्लॅटफॉर्म

४२ मी – १

३२ मी – ३

२७ मी – ३

हायड्रॉलिक लॅडर प्लॅटफॉर्म

९० मी – १

७८ मी – १

७० मी – १

३८ मी – १

५२ मी – २

टर्न टेबल लॅडर

६४ मी – २

५५ मी – १

३७ मी – ३

३२ मी – १

३० मी – १