मुंबई : राजस्थान येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘अखिल भारतीय अग्निशमन सेवा क्रीडा स्पर्धा २०२६’मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाने चमकदार कामगिरी केली. मुंबई अग्निशमन दलाने या स्पर्धेत तब्बल ६४ पदकांवर आपली मोहर उमटवली असून अग्निशमन दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
राजस्थानमधील उदयपूर येथे २७ ते ३१ जानेवारी या कालावधीत अखिल भारतीय अग्निशमन सेवा क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील १२०० हून अधिक अग्निशमन दलांचे जवान या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत मुंबई अग्निशमन दलातील ४२ जवानांचा सहभाग असलेला संघ सहभागी झाला होता. या संघाने एकूण ६४ पदके जिंकली. यात २१ सुवर्ण, २१ रौप्य आणि २२ कांस्य पदकांचा समावेश आहे.
दहा महिला अग्निशमन जवानांनीही स्पर्धेत सक्रियपणे भाग घेत पदकांच्या यादीत योगदान दिले. स्पर्धेत पार पडलेल्या अग्निशमन संबंधीच्या सर्व कवायतींमध्येही मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी कौशल्य दाखवत उत्कृष्ट कामगिरी केली. केंद्र अधिकारी संकेत नाईक यांनी टेबल टेनिस, लॉन टेनिस आणि बॅडमिंटनमध्ये १२ पदके जिंकली. स्पर्धेतील विजेत्या पथकाचे नेतृत्व उप प्रमुख अग्निशमन अधिकारी डॉ. दीपक घोष यांनी केले. तसेच डॉ. घोष यांनी वैयक्तिक अग्नी कवायत स्पर्धेत (५५ वर्षांवरील वयोगटात) दोन रौप्य पदकेही पटकावली.
या सर्व स्पर्धकांचे बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर ) डॉ. अश्विनी जोशी, उप आयुक्त (सामान्य प्रशासन) किशोर गांधी, प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर यांनी अभिनंदन केले.
यापूर्वीही उत्कृष्ट कामगिरी
मुंबईकरांचा आगीपासून बचाव करण्यासाठी मुंबई अग्निशमन दल नेहमीच समर्पित भावनेने कार्यरत असते. यासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत अग्निशमन दलाच्या जवानांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अमेरिकेतील अलाबामा प्रांतात बर्मिंगहॅम येथे २८ जून ते ६ जुलै २०२५ दरम्यान पार पडलेल्या जागतिक पोलिस व अग्निशमन क्रीडा स्पर्धेत (World Police & Fire Games 2025) मुंबई अग्निशमन दलाने एकूण ४ पदके जिकली.
यासोबतच जानेवारी २०२५ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय अग्निशमन क्रीडा स्पर्धेत मुंबई अग्निशमन दलाने १६ सुवर्ण पदकांसह एकूण ४० पदके जिंकून उत्कृष्ट कामगिरी केली होती.

