scorecardresearch

मुंबई अग्निशमन दलातील भरती प्रक्रिया नव्या वर्षातच

गेल्या काही वर्षांपासून रखडलेली मुंबई अग्निशमन दलातील भरती प्रक्रिया आता नवीन वर्षातच सुरू होणार आहे.

मुंबई अग्निशमन दलातील भरती प्रक्रिया नव्या वर्षातच
मुंबई अग्निशमन दल(संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

गेल्या काही वर्षांपासून रखडलेली मुंबई अग्निशमन दलातील भरती प्रक्रिया आता नवीन वर्षातच सुरू होणार आहे. दहिसर पश्चिमेकडील भावदेवी मैदानात ही भरती प्रक्रिया होणार असून त्याकरिता अग्निशमन दलाने मागवलेल्याला निविदांना कमी प्रतिसाद मिळाल्यामुळे भरती प्रक्रिया रखडली आहे.

हेही वाचा >>>मुंबई: नाकावाटे देण्याची इन्कोव्हॅक लस फक्त खासगी रुग्णालयातच

मुंबई अग्निशमन दलातील अग्निशामक या पदासाठीची भरती प्रक्रिया अखेर बऱ्याच प्रतीक्षेनंतर सुरू झाली आहे. या भरतीसाठीची बहुप्रतिक्षित जाहिरात लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. दहिसर पश्चिमेकडील भावदेवी मैदानात ही भरती प्रक्रिया होणार असून त्याचे चित्रीकरणही केले जाणार आहे.त्याकरिता अग्निशमन दलाने नुकत्याच निविदा मागवल्या होत्या. मात्र त्याला कमी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे.त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मधल्या काळात मराठा आरक्षणाचा तिढा, टाळेबंदी व करोनामुळे अग्निशमन दलातील रखडलेली भरती प्रक्रिया आता वेगळ्या कारणामुळे रखडली आहे. यापूर्वी २०१७ मध्ये भरती झाली होती तशीच भरती आता होणार आहे. बारावी उत्तीर्ण इच्छुक उमेदवारांची पारंपरिक पद्धतीने शारीरिक तपासणी, वैद्यकीय तपासणी यांचा या प्रक्रियेत समावेश आहे. भरतीसाठी दहिसरच्या मैदानात तयारीसाठी कंत्राटदार निश्चित झाल्यानंतर भरतीची जाहिरात दिली जाईल.

हेही वाचा >>>आदित्य ठाकरे न्यायालयात जाण्याच्या तयारीत?; दिशा सालियनप्रकरणी आरोप

जाहिरात निघाल्यानंतर प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर उमेदवार निवडीची प्रक्रिया वैद्यकीय चाचणी यासाठी दोन महिने लागतील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने उमेदवारांचे सहा महिन्यांचे प्रशिक्षण अशा प्रक्रिया पार पाडून सगळे सुरळीत झाले तरी उमेदवारांना प्रत्यक्ष रुजू व्हायला एक वर्ष जाईल असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मुंबई अग्निशमन दलात सुमारे तीन हजार अग्निशामक जवान, अधिकारी, वाहनचालक असे मनुष्यबळ आहे. त्यापैकी अडीच हजार अग्निशामक जवान आहेत. मात्र पदोन्नती किंवा निवृत्तीमुळे पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त झाली होती. रिक्त जागांसाठी ही भरती होणार असल्याची माहिती अग्निशमन दल प्रमुख संजय मांजरेकर यांनी दिली.

टाळेबंदीमुळे पोलीस भरतीमध्ये जशी वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवली तशीच सूट या भरतीतही देण्यात येणार असून त्याला नुकतीच प्रशासकीय मंजुरी मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे आता खुल्या गटासाठी वयोमर्यादा २५ ऐवजी २७ वर्षे असेल तर आरक्षित प्रवर्गांसाठी हीच मर्यादा ३० ऐवजी ३२ वर्षे असेल. तसेच सातत्याने रिक्त होणाऱ्या पदासाठी प्रतीक्षा यादी करता येईल का याबाबतही विचार केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-12-2022 at 11:52 IST

संबंधित बातम्या