मुंबई : सध्या मुंबईसह महाराष्ट्रात वाढत्या तापमानामुळे उष्णता वाढली आहे. वाढत्या तापमानामुळे घरांमध्ये, कार्यालयांमध्ये तसेच व्यापारी आस्थापनांमध्ये विद्युत यंत्रणांवर ताण येऊन शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुंबईकरांनी नियमांचे पालन करून खबरदारी घ्यावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाने केले आहे.
मुंबई व महाराष्ट्रात तापमान वाढते आहे. उन्हाळा प्रखरतेने जाणवत आहे. घरांमध्ये, कार्यालयांमध्ये तसेच व्यापारी संकुलांमध्ये पंखे, एअर कुलर, वातानुकुूलित यंत्र, फ्रिज व इतर विद्युत उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते. याशिवाय उष्ण व कोरडे वातावरण, ज्वलनशील पदार्थाची अयोग्य साठवणूक, कचरा जाळणे तसेच गॅस गळती यांसारख्या कारणांमुळेही आग लागण्याचा धोका वाढू शकतो. ही बाब लक्षात घेऊन मुंबई अग्निशमन दलाने नागरिकांना सतर्क राहून आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी घरातील व इमारतीतील विद्युत वायरिंग, स्विच बोर्ड आणि प्लग पॉइंट्स यांची नियमित तपासणी करुन त्यांच्या जोडणीबाबत खात्री करावी. तसेच एका प्लग पॉइंटमध्ये अनेक उपकरणे जोडून ओव्हरलोडिंगसारखे प्रकार टाळावे असे आवाहनही करण्यात आले आहे.
अशी काळजी घ्या ….
एअर कंडिशनर, कुलर इत्यादी उपकरणे वापरताना सुरक्षित व दर्जेदार विद्युत जोडणीचा वापर करावा. घरात किंवा परिसरात कचरा, झाडांची, वेलींची कोरडी पाने किंवा इतर ज्वलनशील वस्तू जाळू नये. एलपीजी गॅस सिलिंडर व गॅस पाईपची संबंधित तज्ज्ञांकडून नियमित तपासणी करावी. प्रत्येक इमारतीतील, घरातील व निवासी / अनिवासी दालनातील अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत आहेत का, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन मुंबई अग्निशमन दलाकडून करण्यात आले आहे.
आग लागल्यास इथे संपर्क साधावा …
इमारतींचे, व्यापारी संकुलांचे जिने तसेच आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग मोकळे ठेवावेत. जेणेकरून एखादी घटना घडल्यास नागरिकांना सुखरुपपणे बाहेर पडता येईल. यासोबतच आपली वाहने निश्चित केलेल्या जागेत उभी करावीत. दुर्दैवाने कुठे आग लागण्याची घटना घडल्यास अग्निशमन दलाच्या वाहनांच्या मुक्त व सुरळीत हालचालीसाठी आवश्यक तेवढी पुरेशी जागा मोकळी ठेवावी. कोणत्याही प्रकारची आग लागल्यास घाबरून न जाता तात्काळ मुंबई अग्निशमन दलाच्या १०१ किंवा ०२२-२३००१३९०, ०२२-२३००१३९३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रमुख अग्निमशन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांनी केले आहे.
