मुंबई : देशातील पहिली सलग १५ डब्यांची लोकल चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीने( आयसीएफ) तयार केली आहे. ही पहिलीच लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात लवकरच येणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर १२ डब्यांच्या लोकलच्या वेळेवर १५ डब्यांच्या लोकल चालवण्यात येणार आहेत. गर्दीच्या वेळी १५ डब्याच्या गाडीत एकाच वेळी ७,५५५ प्रवासी प्रवास करू शकतील.

पश्चिम रेल्वेमार्गावर आतापर्यंत १२ डब्यांना तीन डबे जोडून १५ डब्यांच्या लोकल तयार केल्या जात होत्या. परंतु, त्यामुळे लोकल रेकमध्ये वाढ होत नव्हती. तसेच डब्यांची कमतरता भासत होती. यावर उपाय म्हणून पहिली सलग १५ डब्यांची पूर्ण स्वदेशी बनावटीची लोकल आयसीएफने तयार केली आहे. ही लोकल १८ फेब्रुवारी रोजी चेन्नईवरून मुंबईच्या दिशेने रवाना झाली. तसेच अशी दुसरी लोकल फेब्रुवारीअखेरपर्यंत येण्याची चिन्हे आहेत. अशा प्रकारच्या आणखी १२ लोकल लवकरच पाठवण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात अशी एक लोकल वाढल्यास २० ते २२ लोकल फेर्‍या १५ डब्यांच्या होतील. भविष्यात २४० लोकल १५ डब्यांच्या करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. दरम्यान, पश्चिम रेल्वेवर गुरुवारी चार नवीन लोकल सेवा सुरू केल्या. यात तीन वातानुकूलित लोकल आणि एक सामान्य लोकल चालवण्यास सुरुवात झाली.

फलाटांची लांबी वाढविण्याचे काम वेगात

अनेक स्थानकाच्या फलाटांची लांबी अपुरी असल्याने, त्यांची लांबी वाढविण्यात येणार आहे. विरार-अंधेरीनंतर वांद्रेपर्यंत १५ डबा लोकलचा विस्तार करण्यासाठी विलेपार्ले, सांताक्रूझ, खार रोड आणि वांद्रे या चार स्थानकांची फलाटांची लांबी वाढवण्याचे काम सुरू आहे.