मुंबई : राज्यात सध्या सुरू असलेल्या वार्षिक मासेमारी बंदी कालावधीमुळे स्थानिक पातळीवर समुद्री माशांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात घटला असून परराज्यातील माशांवर मासळी बाजार अवलंबून आहेत. मुंबईतील बाजारपेठांमध्ये बंगाल आणि ओडिसा या राज्यांतून माशांची आवक वाढली आहे. वाहतूक खर्च, मर्यादित उपलब्धता आणि वाढती मागणी यामुळे माशांच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे खवय्यांना खिशाला मोठी झळ बसत आहे.
राज्यातील मत्स्यसाठ्याचे संवर्धन आणि एकूण मत्स्य उत्पादन वाढीसाठी राज्य सरकारकडून दरवर्षी सुमारे १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारी बंदी लागू केली जाते. पारंपरिक मच्छीमारांच्या मागणीनुसार यंदा शासनाने बंदी कालावधी वाढवून १ जून ते १५ ऑगस्टपर्यंत केला आहे. त्यामुळे मुंबईतील हजारो मासेमारी बोटी नांगर टाकून किनाऱ्यावर विसावल्या आहेत. बंदी कालावधीत बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू व ओडिसामधून माशांची आवक होते. मात्र सध्या केवळ बंगाल आणि ओडिसामधून मासे आणले जात आहेत.
वाहतूक खर्च, मर्यादित पुरवठा आणि वाढती मागणी यामुळे माशांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. बाजारात सुरमई, पापलेट, रावस, बांगडा आणि बोंबील या माशांच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली असून काही प्रजातीच्या माशांचे दर नेहमीपेक्षा तीन ते चारपटीने अधिक असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मासेमारी बंदीचा कालावधी संपेपर्यंत ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र तरीही पदरमोड करून खवय्ये जिभेचे चोचले पुरवत आहेत. ताज्या माशांच्या किंमती परवडत नसल्याने काहीजणांनी शीतगृहात साठवून ठेवलेले मासे व उन्हाळयात साठवून ठेवलेला सुका जवळा, सोडे, वाकटया, सुके बोंबील आदींचा ताटात समावेश केला आहे.
दरम्यान, मासेमारी बंदीच्या कालावधीत मच्छीमारांचे व्यवसाय बंद झाल्याने त्यांचीही परवड होऊ लागली आहे. त्यामुळे शासनाने मच्छीमारांना काही प्रमाणात आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी मच्छीमार प्रफुल भोईर यांनी केली आहे. तसेच, माशांचा दर्जा, त्यांचे आकारमान आणि समुद्रातील माशांचे प्रमाण वाढण्यासाठी बंदी कालावधी वाढविणे फायद्याचे आहे, असे मत अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी व्यक्त केले.
मासळीचे सध्याचे दर
पूर्वीचे दर ( प्रति किलो)
पापलेट १६०० – १७४०… ८०० – ९०० रुपये
सुरमई १३०५ – १४५०… ८०० – ९०० रुपये रावस १३०५ – १४५०….५०० – ६०० रुपये
बोंबील ५३७ – ६२४….१५० -२०० रुपये
शीतगृहातील माशांचे दर (प्रति किलो)
बांगडा – २६१ ते
२९० रुपये सुरमई
– ८७० ते ९४३ रुपये मोठी सुरमई –
१०८८ रुपये हलवा – ७२५ रुपये पापलेट – १४५० रुपये लहान पापलेट – ६५३ रुपये
