मुंबई : मी पावसाचे आभार मानतो. कारण, आजपर्यंत मुंबई ठाकरेंमुळे तुंबत होती. मुंबईत ठाकरेंमुळे पाणी साचत होते. मुंबईतील रस्त्यांवर खड्डे ठाकरेंमुळे पडत होते. पण, यंदा प्रथमच मुंबई ठाककरेंमुळे नाही तर पावसामुळे तुंबली आहे, असा उपरोधिक टोला शिवसेना ठाकरे गटाचे सदस्य भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

एक महिना उशिराने आलेल्या पावसाने मुंबई तुंबली. झाडे पडून लोकांचा मृत्यू झाला. मॅनहोलमध्ये पडून लोकांचा मृत्यू झाला. पण हे मुंबईत पहिल्यांदाच ठाकरे यांच्यामुळे नाही तर पावसामुळे घडत आहे, त्यामुळे मी पावसाचे आभार मानतो, असे टोला भास्कर जाधव यांनी लगावला.

मिसिंग लिंकला २७० किलोमीटर प्रति तास वारा आला तरीसुद्धा धक्का लागणार नाही, असा दावा करण्यात आला. आता पहिल्याच पावसात मिसिंग लिंकला गळती लागली. सरकार सांगत आहे, मिसिंग लिंकला काहीच झाले नाही. पण, जे झाले ते सर्व लोकांनी बघितला आहे, सरकार आता किती आणि काहीही दावा करत असले तरीही लोकं त्यावर विश्वास ठेवणार नाही, असे जाधव म्हणाले.

रत्नागिरी, खेड, चिपळूणला दरवर्षी पूर

रत्नागिरी, खेड, चिपळूण या शहरांना दरवर्षी पावसाळ्यात पुराच्या पाण्याचा फटका बसतो. खाडींच्या शेजारी बाजारपेठ असल्यामुळे या बाजारपेठांमध्ये दरवर्षी पाणी जाते. कोकणची एकूण परिस्थिती पाहता खाडीच्या शेजारीच बाजारपेठा असणे दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे आहे. पण, पूरस्थितीवर सरकार काही उपाययोजना करताना दिसत नाही, अशी मागणीही त्यांनी केली.

मुंबई महापालिका क्षेत्रातून जनावरांचे गोठे हटवा

मुंबई महापालिका क्षेत्रात जनावरांचे अनेक गोठे आहेत. या जनावरांच्या गोठ्यातील घाण किंवा टाकाऊ पदार्थांमुळे अनेक ठिकाणी पाणी अडवले जाते. त्यामुळे मुंबई महापालिका क्षेत्रातून जनावरांचे गोठे तातडीने महापालिका क्षेत्राबाहेर न्यावेत. पालिका क्षेत्रातून गोठे तातडीने हटवावेत, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली.