मुंबई : फेब्रुवारी महिना उजाडला की मुंबईकरांनावेध लागतात ते मुंबई पुष्पोत्सवाचे. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही ६ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यंदाचा पुष्पोत्सव संगीत संकल्पनेवर आधारित असून विविध वाद्यांच्या प्रतिकृती विविधरंगी व सुगंधी फुलांनी साकारण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते शुक्रवारी पुष्पोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई पुष्पोत्सवाचे यंदाचे हे २९ वे वर्षे आहे. महानगरपालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, उप आयुक्त अजितकुमार आंबी यांच्या उपस्थितीत शुक्रवार, ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता मुंबई पुष्पोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर रात्री ८ पर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील.

उर्वरित दोन दिवस म्हणजेच ७ आणि ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत ‘मुंबई पुष्पोत्सव’ नागरिकांसाठी खुला असेल. संगीत या संकल्पनेवर आधारित या पुष्पोत्सवात बासरी, वीणा, टाळ- मृदुंग, सतार, सनई-चौघडा, हार्मोनियम, पखवाज, तबला, तुतारी, सेक्सोफोन, गिटार आदी संगीत वाद्यांच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत.

आतापर्यंत या पुष्पोत्सवात कार्टून, आमची मुंबई, संगीत, सेल्फी पॉईंट, डिस्ने लँड, जलजीवन, ॲक्वाटीक वर्ल्ड, ॲनिमल किंग्डम, भारताची राष्ट्रीय प्रतीके आदी संकल्पनांवर आधारित फुलांची सजावट करण्यात आली आहे. या पुष्पोत्सवात ५ हजारांहून अधिक फुलझाडे, फळझाडे व औषधी वनस्पती पाहण्याची संधी मिळेल. तसेच, बागकाम व उद्यानविषयक मोफत कार्यशाळा देखील घेण्यात येणार आहेत. या ठिकाणी रोपे, खते व उद्यानविषयक साहित्याची विक्री करणारे स्टॉलही लावण्यात आले आहेत.

मुंबई पुष्पोत्सवाची खासियत म्हणजे आपल्याला एकाच छताखाली वेगवेगळ्या रंगांची, सुगंधाची फुलझाडे पहावयास मिळतात. त्यासाठी महानगरपालिकेचा उद्यान विभाग विशेष परिश्रम घेत असतो. रोपांची लागवड, त्यांची निगा राखणे, त्यांची सजावट करणे आदी गोष्टींवर उद्यान विभागाचे अधिकारी-कर्मचारी लक्ष ठेवून असतात, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.