मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात येत असलेला दादर येथील टिळक पूल, भायखळा, प्रभादेवी आणि घाटकोपर या उड्डाणपुलांच्या कामांना वेग आला आहे. या उड्डाणपुलांची विविध टप्प्यांवरील कामे प्रगतीपथावर असून प्रकल्प वेळापत्रकांनुसार वर्षभरात प्रभादेवी आणि भायखळा उड्डाणपूल पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच, पुढील वर्षात दादर आणि घाटकोपर येथील उड्डाणपूल उभे राहतील.
‘महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ने (महारेल) मुंबईतील चारही उड्डाणपुलांचे काम हाती घेतली आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडी) आणि महारेल प्रभादेवी उड्डाणपुलाचे काम करत आहेत. प्रभादेवी उड्डाणपुलावरील जुना पूल पाडण्याचे काम पूर्ण झाले असून, सर्व ओपन वेब गर्डर्सचे फॅब्रिकेशनही पूर्ण झाले आहे. सध्या उपसंरचना आणि गर्डर बसवण्याची कामे सुरू आहेत. प्रभादेवी उड्डाणपुलासाठी पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेने ३५ वर्षांच्या कालावधीसाठी ‘वे-लीव्ह चार्जेस’ची मागणी केली आहे.
मात्र, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. हे चारही उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर रेल्वे फाटकांजवळील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. प्रत्येकी दोन ते तीन मार्गिका उपलब्ध होणार असल्याने रस्त्यांची क्षमता वाढेल, प्रवासाचा वेळ कमी होईल, शहर आणि उपनगरांतील संपर्क अधिक वेगवान होईल, तसेच रेल्वे व रस्ते वाहतुकीतील संघर्ष कमी होऊन सुरक्षिततेतही वाढ होईल.
प्रभादेवी उड्डाणपुलाचे ७० टक्के काम पूर्ण
प्रभादेवी पुलाचे काम सप्टेंबर २०२६पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन होते. परंतु, पश्चिमी आशियाई देशातील सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे तांत्रिक अडचणी आल्याने, पुलाचे काम प्रकल्पाच्या वेळापत्रकानुसार ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. प्रभादेवी उड्डाणपुलासाठी पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेने ३५ वर्षांच्या कालावधीसाठी ‘वे-लीव्ह चार्जेस’ची मागणी केली आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. सध्या प्रभादेवी उड्डाणपुलाचे ७० टक्के कामे पूर्ण झाली आहेत.
भायखळा उड्डाणपूल ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत सेवेत दाखल
भायखळा उड्डाणपुलावर सुपरस्ट्रक्चर आणि रेल्वे मार्गावरील केबल-स्टे संरचनेची कामे पूर्ण झाली असून, केवळ जोडणीची कामे शिल्लक आहेत. दादरच्या बाजूला प्रबलित मृदा भिंतीचे (रिइन्फोर्स्ड अर्थ वॉल) काम सुरू असून, सीएसएमटी बाजूच्या प्रबलित मृदा भिंतीचे काम प्रलंबित आहे. ९१६ मीटर लांबीच्या या चार पदरी पुलामध्ये १२ नॉन-रेल्वे कंपोझिट स्पॅन असून, ५० मीटर उंच खांब हे त्याचे वैशिष्ट्य आहे. सध्या भायखळा उड्डाणपुलाचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. भायखळा उड्डाणपूल ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.
टिळक पुलाची सुपरस्ट्रक्चरची कामे पूर्ण
दादर येथील टिळक पूल हा मुंबईतील पहिला जुळा (ट्विन) केबल-स्टेड पूल असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याची उभारणी केली जात आहे. या उड्डाणपुलाच्या मुंबई महापालिका हद्दीतील व्हायाडक्ट आणि सुपरस्ट्रक्चरची कामे पूर्ण झाली आहेत. सध्या रेल्वे मार्गावरील स्पॅन, तसेच दोन्ही बाजूंच्या ॲप्रोच रस्त्यांची कामे सुरू आहेत. या प्रकल्पासाठी विशेष प्रकारचे पायलॉन शटर्स, डेक उभारणीसाठी आधुनिक क्रेन आणि दुवा प्रणालीसह असमान केबल-स्टे स्पॅन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. सध्या या पुलाचे काम ४० टक्के पूर्ण झाले असून, उड्डाणपुलाचा पहिला टप्पा ३१ मे २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
घाटकोपर पुलासाठी रेल्वे वाहतूक ब्लॉक आवश्यक घाटकोपर उड्डाणपुलाच्या उजव्या बाजूचे बांधकाम सुरू आहे. हा भाग पूर्ण झाल्यानंतर वाहतूक नव्या मार्गावर वळवून उर्वरित भागाचे काम हाती घेतले जाईल. सध्या पाइलिंग, पाया, पिअर, कॉलम, सुपरस्ट्रक्चर कास्टिंग आणि गर्डर उभारणीची कामे सुरू आहेत. आजघडीला या पुलाची ३३ टक्के कामे पूर्ण झाली असून, डिसेंबर २०२७ पर्यंत कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या पुलांच्या बांधकामासाठी रेल्वे वाहतूक ब्लॉक आवश्यक असून, गर्डर लॉन्चिंग आणि रेल्वे हद्दीतील कामांसाठी रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून आवश्यकतेनुसार ब्लॉक घेतले जाणार आहेत.
आधुनिक केबल-स्टे डिझाइन
दादर टिळक पूल १०० मीटर,
८५ मीटर मुख्य स्पॅन असलेल्या असिमेट्रिक केबल-स्टे रचनेचा आहे. भायखळा पूल ८६.५ मीटर
८६.५ मीटर अशा दोन समान स्पॅनचा सममितीय दुहेरी मार्गाचा केबल-स्टे पूल आहे. घाटकोपर पूल ५४ मीटर
१०८ मीटर
५४ मीटर स्पॅन असलेला ट्विन-पायलॉन, सिंगल कॅरेजवे केबल-स्टे पूल आहे. या पुलांच्या बांधकामासाठी डेक इरेक्शन क्रेनचा वापर करून वाहतूक सुरू असतानाच गर्डर उभारले जाणार असल्याने वाहतुकीवरील परिणाम कमीत कमी राहणार आहे.
शहरी भागातील मोठी अभियांत्रिकी कसरत
भायखळा उड्डाणपुलासाठी मध्यवर्ती भाजी मंडईवर सुमारे १,५०० मेट्रिक टन स्टील संरचना उभारणे हे सर्वात मोठे आव्हान होते. बाजारपेठ बंद न करता आणि वाहतूक विस्कळीत न करता हे काम विशेष तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पूर्ण करण्यात आले. दादरचा टिळक आणि घाटकोपर पुलांवरील स्टील लॉन्चिंगची कामे अद्याप बाकी आहेत. ही कामे सुरू असलेल्या ठिकाणी रेल्वे आणि रस्ते वाहतुकीत कमीत कमी अडथळा निर्माण होईल अशा आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यात येणार आहेत.
