मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाने उत्सवादरम्यान नागरिकांना निर्भेळ, सकस खाद्यपदार्थ मिळावेत यासाठी १ सप्टेंबरपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. मात्र दुधातील भेसळ ओळखताना अन्न निरीक्षकांना अवघड होते. त्यावर मात्रा म्हणून आता अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना मिल्कोस्कॅन यंत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भेसळयुक्त दूध तात्काळ ओळखणे शक्य होणार आहे.

हेही वाचा : मुंबई: लघुवाद न्यायालयातील अनुवादकाला २५ लाखांची लाच स्वीकारताना अटक

दुधामध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन कारवाई करीत असते. अन्न व औषध प्रशासनाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दूध नष्ट केले जाते. दुधामध्ये चुना व युरिया यासारखे घटक मिसळण्यात येतात. मात्र ही बाब अन्न निरीक्षकांच्या सहज लक्षात येऊ लागल्याने आता भेसळ करणाऱ्यांनी दुधात भेसळ करण्यासाठी विविध पर्याय शोधले आहेत. अनेक जण एसएनएफ व फॅटचे प्रमाण राखण्यासाठी दुधामध्ये तेल, तसेच दुधाची पावडर मिसळतात. एक लिटर दुधामध्ये ८०० मिलि लीटर दूध तर २०० मिलि लीटर दूध पावडर आणि तेल वापरल्यास दुधामध्ये केलेली भेसळ लक्षात येत नाही. तसेच अनेक वेळा दूध प्रमाणित मानकानुसार नसते. त्यामुळे अन्न निरीक्षकांना दुधातील भेसळ सहज ओळखणे अवघड होते. ही बाब लक्षात घेता राज्यातील सर्व अन्न निरीक्षकांना दुधातील भेसळ रोखणे शक्य व्हावे यासाठी ‘मिल्कोस्कॅन’ हे यंत्र उपलब्ध करण्यात येणार आहे. यामुळे दुधातील भेसळ ओळखणे अन्न निरीक्षकांना सहज शक्य होईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्याने दिली.