मुंबई : फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रॉन यांचा तीन दिवसांचा भारत दौरा आजपासून सुरू होत आहे. मुंबईत पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्रालय, मलबार हिल आणि लोक भवनच्या परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर फलक लावले आहेत. पदपथांवरही फलक लावल्यामुळे पदचाऱ्यांना अडथळा होत आहे. सार्वजानिक ठिकाणी, रस्ते, चौकांत फलक लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतरही फलक लावून शहराचे विद्रुपीकरण करण्यात आले आहे.

भारत आणि फ्रान्स यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रॉन हे सोमवारपासून तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. मॅक्रॉन यांच्यासोबत त्यांची पत्नी ब्रिगिट याही दौऱ्यावर येणार आहेत. त्याच्या स्वागताचे फलकांनी रस्ते, चौकांचे विद्रुपीकरण झाले आहे. विमानतळ ते मंत्रालय, मंत्रालय ते लोकभवन, मंत्रालय ते ताज हॉटेल मार्गावर मोठमोठे फलक लावले आहेत. पदपथावरही फलक लावले आहेत. फलकांवर मॅक्रॉनसह पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आदींचे फोटो आहेत.

रस्ते आणि पदपथांवरील फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. पदपथांवरील फलकांमुळे पदचाऱ्यांना चालण्यास अडथळा होत आहे. विविध आकाराचे फलक अस्ताव्यस्तपणे लावल्यामुळे आणि काही फलक वाऱ्याच्या झोतामुळे पडल्यामुळे विद्रुपीकरणात भरच पडत आहे.