मुंबई : मुंबईचे माजी महापौर हरेश्वर पाटील यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. मुंबई महानगरपालिकेच्या १९८५ मधील निवडणुकीत प्रभाग क्रमांक १२८ मधून ते पहिल्यांदाच निवडून आले होते. १९९९ ते २००२ या कालावधीत ते मुंबईचे महापौर होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच बुधवारी पालिका मुख्यालयात सुरू असलेली स्थायी समितीची बैठक अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी तहकूब केली.
दहिसरमधील प्रभाग क्रमांक १२८ मधून हरेश्वर पाटील प्रथम निवडून आले होते. निवडून आल्यानंतर त्यांनी प्रशासनात अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले. विभागीय स्तरावरील लोकसहभाग वाढविण्यासाठी १६ प्रभाग समित्यांची स्थापना करण्यात त्यांचा पुढाकार होता. १९९६ ते १९९७ या कालावधीत ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. तसेच १९९९ ते २००२ या कालावधीत ते मुंबईचे महापौर होते. महापालिकेच्या विविध विभागांचे संगणकीकरण सुरू करून त्यांनी प्रशासन अधिक पारदर्शक व कार्यक्षम करण्याचे प्रयत्न केले. कायम कामात व्यस्त असलेल्या पाटील यांचे सर्वच पक्षांतील नगरसेवकांसोबत सलोख्याचे संबंध होते. कोणत्याही पक्षाचा नगरसेवक त्यांच्याकडे कामानिमित्त आला तर,
ते त्याचे काम आवर्जून करत होते. अनेक शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. त्यांनी २०१६ मध्ये शिवसेनेतून भाजपात प्रवेश केला होता. मुंबई महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ मधून त्यांच्या स्नूषा योगिता पाटील निवडून आल्या आहेत.
स्थायी समितीची बैठक तहकूब
पाटील यांच्या निधनाची बातमी बुधवारी स्थायी समितीची बैठक सुरू असताना समजताच समितीचे कामकाज स्थगित करून पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.पाटील यांच्या निधनामुळे आपले शहर एका जनहितदक्ष नागरिकास मुकल्याची भावना सभागृह नेते गणेश खणकर यांनी व्यक्त केली. पाटील हे ज्या प्रभागातून निवडून येत असत त्या प्रभागातून आपण निवडून आल्याची आठवण खणकर यांनी यावेळी सांगितली. हरेश्वर पाटील यांच्या निधनामुळे एक महान व्यक्तीमत्त्व गमावले असल्याचे सांगत श्रद्धांजली वाहिली. हरेश्वर पाटील यांच्या स्मृतीस आदरांजली वाहून स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी कोणतेही कामकाज न करता बैठक तहकूब केली.
