मुंबई : थायलंड येथे पाठविण्यात आलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ असल्याची भीती दाखवून बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रक्रार उघडकीस आला आहे. तक्रारीनंतर याप्रकरणी पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

विलेपार्ले येथे पत्नी आणि दोन मुलांसोबत वास्तव्यास असलेले ६४ वर्षांचे वृद्ध तक्रारदार बांधकाम व्यावसायिक आहेत. अर्धांग वायूचा झटका आल्यानतंर त्यांनी सेवा निवृत्ती घेतली होती. त्यांना ४ एप्रिल रोजी एका अज्ञात व्यक्तीने दूरध्वनी करून कुरियर सर्व्हिस कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्या नावाने मुंबईहून थायलंड येथे पार्सल पाठविण्यात आले होते. त्यात काही कपडे, पारपत्र, लॅपटॉप, क्रेडिट कार्ड आणि ४० ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) हे अमली पदार्थ सापडले आहे. त्या कुरियरवर आपल्या नावाची नोंद असून १५ हजार ६२५ रुपये भरण्यात आल्याचे त्याने सांगितले. यावेळी त्यांनी आपण कोणतीही वस्तू थायलंडला पाठवलेली नाही, असे तक्रारदाराने सांगितले. मात्र दूरध्वनीवर बोलणाऱ्या व्यक्तीने त्यांचे काहीही ऐकून घेतले नाही. संबंधित प्रकरण सायबर पोलिसाकडे गेले आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी बोला असे सांगून त्यांनी एका व्यक्तीला दूरध्वनी दिला. त्या व्यक्तीने आपण गुन्हे शाखेतून रजत पटेल बोलत असल्याचे सांगून त्यांची चौकशी सुरू केली. त्यांच्या वैयक्तिक कागदपत्रांचा कोणी तरी गैरवापर केला आहे. त्यामुळे या सर्व बाबी तपासण्याचे काम सुरू आहे. गेल्या काही दिवसांत अशा प्रकारे फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत, असेही त्याने तक्रारदारांना सांगितले. त्यानंतर त्याने त्यांना स्काईपवर बोलण्यास प्रवृत्त केले. या ॲपवर दूरध्वनी केल्यानंतर त्यांना मुंबई सायबर क्राईम असे नाव आणि लोगो असल्याचे दिसले. त्यामुळे तक्रारदारांचा त्याच्यावर विश्‍वास बसला. एकमेकांशी चॅट आणि मोबाइलवर संभाषण करताना त्याने आर्थिक गैरव्यवहारात सहभाग असल्याचे निदर्शनास आले असून त्यांच्यावर कारवाई होण्याची धमकी दिली होती.

हेही वाचा – आणखी एका अनधिकृत जाहिरात फलकावर म्हाडाचा हातोडा

केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) प्रमुख मोहीत मेहरा त्यांच्याशी स्काईप आयडीवर संपर्क साधणार असल्याचे तक्रारदारांना सांगण्यात आले. त्यानंतर तक्रारदारांना एका व्यक्तीने दूरध्वनी केला. त्यांना विश्‍वासात घेऊन त्यांच्या बँक खात्याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या नावाने विविध बँकेत खाती उघडली असून त्यात खंडणीची कोट्यवधी रुपयांची रक्कम जमा झाल्याचा आरोप केला होता. काही वेळानंतर त्यांनी त्यांच्या बँक खात्यातील व्यवहार तपासण्यासाठी पैसे पाठविण्यास सांगितले. त्यामुळे तक्रारदारांनी संबंधित व्यक्तीने दिलेल्या बँक खात्यात सुमारे अडीच कोटी रुपये हस्तांतरित केले. या पैशांची चौकशी करून ती रक्कम त्यांना परत पाठविली जाईल, असे सांगण्यात आले होते. ही रक्कम हस्तांतरित केल्यानंतर त्यांच्याकडून पैसे जमा झाल्याचे पत्र पाठविण्यात आले होते. चार दिवसांनी त्यांना सर्व आरोपातून मुक्त केल्याचे पत्र पाठविण्यात आले. मात्र त्यांना सुरक्षा हमी म्हणून तीस लाख रुपये भरावे लागतील. ही रक्कम जमा केल्यानंतर त्यांची रक्कम त्यांना पुन्हा पाठविण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी तीस लाख रुपये जमा करून उर्वरित पैसे पाठविण्याची विनंती केली. मात्र ही रक्कम संबंधित व्यक्तीने पाठविली नाही. वारंवार विचारणा करुनही त्यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही.

हेही वाचा – दक्षिण मुंबईत वास्तव्याला असलेल्या बांगलादेशी नागरिकांना अटक

अशा प्रकारे अज्ञात सायबर ठगांनी विदेशात पाठवलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ असल्याची बतावणी केली. तक्रारदारांच्या कागदपत्रांवरून विविध बँकेत खाती उघडण्यात आली असून त्यात खंडणीची कोट्यवधी रुपयांची रक्कम जमा झाल्याचे सांगून कारवाईची धमकी देण्यात आली. त्याद्वारे त्यांना विविध बँक खात्यात अडीच कोटी रुपये पाठविण्यास प्रवृत्त करण्यात आले.