मुंबईः बँक व्यवस्थापकाला एका खाजगी कंपनीच्या संचालकाच्या नावाने बनावट अर्ज पाठवून बँक खात्यातून आठ लाख रुपये काढण्यात आल्याचा प्रकार वांद्रे-कुर्ला संकुल(बीकेसी) परिसरात घडला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर बँक व्यवस्थापकाने याप्रकरणी बीकेसी पोलिसांकडे तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.

मिरारोड येथे वास्तव्यास असलेले ३९ वर्षीय तक्रारदार एका खासगी बँकेत शाखा व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. ते १३ मे रोजी बँकेत काम करीत होते. यावेळी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने दूरध्वनी करून तो गॅलेक्सी डायमंड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील लेखापाल बोलत असल्याचे सांगितले. कंपनीतील कर्मचारी, संचालकासोबत एका कर्मचार्‍याला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी आलो असल्याचे त्याने तक्रारदारांना सांगितले. त्यांच्या कंपनीचे संचालक चिरागकुमार संघवी यांनी तक्रारदारांच्या मोबाइलवर एक विनंती अर्ज केला आहे. या अर्जावरील बँक खात्यात तातडीने आठ लाख रुपये हस्तांतरित करण्याची विनंती त्यात करण्यात आली होती. तक्रारदारांनी मोबाइलवरील विनंती अर्ज पाहिला. कंपनीच्या अधिकृत लेटरहेडवर अर्ज करण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यात अखिलेशकुमार नावाच्या व्यक्तीच्या खात्यावर आठ लाख रुपये हस्तांतर करण्याची विनंती करण्यात आली होती. विश्वास संपादन करण्यासाठी या अर्जावर कंपनीचे संचालक चिरागकुमार संघवी, मोनिका संघवी या संचालकाच्या स्वाक्षरी होत्या. ते लेटरहेड आणि स्वाक्षरी कंपनीच्या संचालकांचे असल्याची समजूत करून त्यांनी संबंधित बँक खात्यात ही रक्कम हस्तांतरित केली.

हेही वाचा – मुंबई : ‘एमएमआरडीए’ची वसुलीवर भिस्त; पालिकेकडे चार हजार, तर सरकारकडे साडेतीन हजार कोटींची थकबाकी

तीन दिवसांनी कंपनीचा एक कर्मचारी बँकेत आला, त्याने आठ लाखांच्या व्यवहाराबाबत तक्रारदार बँक व्यवस्थापकाशी चर्चा केली असता त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. कंपनीच्या संचालकांनी अशा प्रकारे कोणालाही लेटरहेडवर रक्कम हस्तांतरित करण्याची विनंती केली नव्हती, असे या कर्मचाऱ्याने सांगितले. कंपनीचे संचालक महाबळेश्‍वर यांनीही असा कोणताही अर्ज केला नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आरोपींनी आपली फसवणूक केल्याचे बँक व्यवस्थापकाच्या लक्षात आले.

हेही वाचा – Dombivli MIDC : आणखी एका कारखान्याला आग, स्फोटांच्या मालिकेमुळे परिसरात घबराट

हा प्रकार निदर्शनास येताच बँकेच्या वतीने व्यवस्थापकाने बीकेसी पोलिसांत तक्रार केली. बँक खात्याची माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंध कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कंपनीच्या संचालकाच्या नावाने केलेला लेखी अर्ज पोलिसांना तक्रारीसोबत देण्यात आला असून त्यात आरोपींनी पाठवलेले लेटरहेड व इतर माहिती बारकाईने नमुद केली आहे. त्यामुळे परिचित व्यक्तीचा या प्रकरणात सहभाग असल्याचा पोलिसांना सशय आहे. याप्रकरणी रक्कम हस्तांतरित करण्यात आलेल्या बँक खात्याच्या माहितीद्वारे पोलीस अधिक तपास करीत आहेत.