मुंबईच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले असल्यामुळे सर्व स्तरातून टीका झाल्यानंतर आणि न्यायालयानेही फटकारल्यानंतर पालिका प्रशासनाने सर्व २४ विभागांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा निधी दिला आहे. खड्डे बुजवण्यासाठीचे शीत मिश्रण खुल्या बाजारातून खरेदी करण्यासाठी हा निधी देण्यात आला आहे.

हेही वाचा >>>मांसाहारी खाद्यपदार्थांच्या जाहिरातींवर बंदीची मागणी; तीन जैन ट्रस्टची जनहित याचिका

गणेशोत्सवापासून मुंबईत पुन्हा एकदा पावसाला सुरूवात झाल्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा खड्डे पडू लागले आहेत. खड्डे बुजवण्यासाठी भरलेले मिश्रण पावसात निघून जात असल्यामुळे पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडत आहेत. त्यावरून समाजमाध्यमांवर पालिकेला टीका होत आहे. त्यातच मुंबई उच्च न्यायालयानेही पालिकेवर ताशेरे ओढले आहेत. मुंबईत यंदा पावसाळ्यात खड्ड्यांची संख्या कमी झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला होता. मात्र यावेळीही ३३ हजारापर्यंत खड्डे बुजवण्यात आले असल्याचे प्रशासनाने मान्य केले आहे. त्यामुळे रस्त्यांची दूरवस्था यावर्षीही तशीच असल्याचे आढळून आले आहे.

हेही वाचा >>>दहीहंडीनंतर आता नवरात्र; लालबाग परळमध्ये भाजपाकडून मराठी दांडियाचे आयोजन

दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर पालिका प्रशासन प्रत्येक विभागाला दीड कोटींचा निधी पुरवते. खड्डे आणि खडबडीत भाग दुरुस्त करण्यासाठी हा निधी दिला जातो. तसेच विभागांच्या मागणीनुसार खड्डे भरण्यासाठी शीत मिश्रणाचा पुरवठाही केला जातो. यावर्षी गणपतीनंतरही पाऊस पडल्यामुळे पालिकेचे नियोजन कोलमडले आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्यामुळे निधी आणि मिश्रणाची कमतरता निर्माण झाली आहे. नव्याने पडणारे खड्डे बुजवण्यासाठी आता पालिकेच्या २४ विभागांना ५ लाखांचा निधी देण्यात आला आहे.पावसाळ्यापूर्वी दिलेले डांबर व खडीचे शीतमिश्रण विभागांमध्ये संपले असून नव्याने विभाग कार्यालयांनी मिश्रणाची मागणी केली आहे. त्यामुळे खुल्या बाजारातून हे मिश्रण विकत घेण्यासाठी हा निधी देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.