मुंबई : शिक्षण संचालनालयाने राज्यातील अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची अतिरिक्त मुदत दिली. त्यामुळे अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. अनेक विद्यार्थ्यांकडे प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यामुळे त्यांना पहिल्या फेरीमध्ये प्रवेश घेण्यात अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
इयत्ता अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ३ जूनपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. आतापर्यंत २ लाख ७० हजार विद्यार्थ्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. मात्र विविध जात प्रवर्ग आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नॉन-क्रीमी लेयर आणि ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
अनेक विद्यार्थ्यांकडे ही प्रमाणपत्रे उपलब्ध नसल्याने त्यांना प्रमाणपत्र सादर करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी, पालक, तसेच विविध संघटनांकडून प्रमाणपत्रे सादर करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी शिक्षण संचालनालयाकडे करण्यात येत होती.
या मागणीची दखल घेत शिक्षण संचालनालयाने एनसीएल किंवा ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांकडून प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याची पोहोच पावती किंवा हमीपत्र घेऊन त्यांना प्रवेश देण्यात यावा. तसेच आवश्यक प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात यावी, असे निर्देश शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी कनिष्ठ महाविद्यालयांना दिले आहेत.
या निर्णयामुळे प्रमाणपत्रे मिळण्यात विलंब झालेल्या हजारो विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतून वंचित राहावे लागणार नाही. शिक्षण संचालनालयाच्या या निर्णयामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थ्यांना वेळेत प्रवेश निश्चित करता येतील.
